सध्या चालू असलेल्या पितृपक्षाच्या कालावधीत काही बुद्धीजीवींकडून ‘श्राद्ध’ या विधीविषयी सामाजिक माध्यमांद्वारे अपप्रचार करण्यात येत आहे. त्यावर अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य काय आहे, ते येथे देण्याचा प्रयत्न करत आहोत.
१. अपप्रचार : श्राद्ध विधीमध्ये ब्राह्मणच का लागतो ? इतर जातीचे का चालत नाहीत ? श्राद्ध ही ब्राह्मणांच्या सोयीसाठी निर्माण केलेली प्रथा आहे.
खंडण : श्राद्ध विधी हिंदूंच्या धर्मग्रंथातील एक अविभाज्य अंग आहे. श्राद्धविधीमध्ये ‘ब्राह्मण’ शब्दाचा केलेला उल्लेख जातीशी संबंधित नसून वर्णाशी संबंधित आहे. जाती या ३०० वर्षांच्या कालावधीत निर्माण झाल्या आहेत. जन्माने नाही, तर जो कर्माने ब्राह्मण आहे, त्या व्यक्तीला मग तो कोणत्याही जातीचा असो, त्याला दान द्यावे, असा उल्लेख श्राद्धविधीमध्ये येतो. आजच्या भाषेत सांगायचे, तर ज्याची रामायण-महाभारत या धर्मग्रंथावर नितांत श्रद्धा आहे, जो रामकृष्णांचा वारसा अभिमानाने सांगतो, नित्यनेमाने उपासना (साधना) करतो, असा हिंदु व्यक्ती त्याला तुम्ही ब्राह्मण म्हणू शकता आणि त्याला जेवायला घालू शकता.
आता दुसर्या बाजूने विचार करूया. भारतात ब्राह्मणांची लोकसंख्या ३ टक्के आहे. त्यातील पौरोहित्य करणारे ब्राह्मण किती असतील, तर १ टक्का, म्हणजे एक टक्का ब्राह्मण श्राद्ध भोजनासाठी सर्वांच्याच घरी जेवायला कसे जाऊ शकतात ? याचेही उत्तर शोधावे लागेल. गावागावांत आपल्याच भाऊबंदकीमधील लोकांना पितर म्हणून जेवायला सांगतात, ब्राह्मणांना नव्हे.
२. अपप्रचार : जिवंतपणी आई वडिलांची सेवा करा, मेल्यानंतर श्राद्ध करण्याचा काय लाभ ? असा बुद्धीभेद काही बुद्धीजीवी करत असतात.
खंडण : एरव्ही हिंदूंचे धर्मशास्त्र आणि मंदिर मान्य न करणारे बुद्धीजीवी लोक मात्र श्राद्ध विधीविषयी सोयीस्कररित्या संत कबीर यांच्या दोह्यांचा दाखला देतात. तो असा की,
जिंदा बाप कोई न पूजे, मरे बाद पुजवाया ।
मुठ्ठीभर चावल लेके, कौवे को बाप बनाया ।।
जे लोक आई-वडिलांचा जिवंतपणी सांभाळ करत नाहीत; मात्र श्राद्धविधी करतात, असे लोक किती चुकीचे आहेत, त्याविषयी संत कबीर या दोह्याच्या माध्यमातून सांगत आहेत. त्यांनी ‘श्राद्ध विधी करू नका’, असे कुठेही म्हटलेले नाही.
श्राद्धविधी करणार्या व्यक्तीने आई-वडिलांची सेवा केलेलीच नसते आणि श्राद्धविधी करत नसलेल्या व्यक्तीने आई-वडिलांची जिवंतपणी सेवा केलेली असते, असा सरसकट अर्थ कुणी काढू नये. उलट आम्ही या मताचे आहोत की, जे लोक मेल्यानंतरही आई-वडिलांना श्राद्ध रूपाने पाणी देत आहेत, पिंडदान करत आहेत, त्यांनी नक्कीच जिवंतपणी त्यांची सेवा केलेली असणार.
स्वतःच्या वडिलांना नरकयातना भोगायला लावणार्या औरंगजेबाला त्याचे वडील शहाजहान म्हणाले होते की, ‘तू मला कारागृहात ठेवून यातना देत आहेस, जिवंतपणी साधे पाणीसुद्धा देत नाहीस. धन्य आहेत ते हिंदू की, जे मेल्यानंतरही आपल्या वडिलांना पाणी देत आहेत.’ अशी आमची महान हिंदु संस्कृती आहे.
३. अपप्रचार : हिंदूंच्या श्राद्धविधीमध्ये कावळ्याला नैवेद्य का देतात ?
खंडण : एरव्ही उन्हाळा चालू झाला की, बाहेर पाण्याची बालदी भरून ठेवा, पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी ते उपलब्ध होईल, प्राण्यांवर दया करा, अशा वल्गना बरेच जण करतात; पण हिंदूंच्या श्राद्धविधीमध्ये कावळ्याला पिंडदान का देतात ? असा आरोप करतात. अध्यात्मशास्त्रानुसार ‘श्राद्धामध्ये पिंडदानाच्या माध्यमातून पितरांना आवाहन केले जाते. पितरांच्या अतृप्त इच्छा पिंडाच्या माध्यमातून तृप्त होतात. पितरांचा लिंगदेह पिंडाकडे आकृष्ट होतो, तेव्हा तो रज-तमात्मक लहरींनी भारीत होतो. या लहरींकडे कावळा आकृष्ट होतो. पितर सूक्ष्मरूपात श्राद्धस्थानी येऊन त्यांची तृप्ती झाल्याचे सूचक म्हणजे, पिंडाला कावळा शिवणे. (पितरांचा लिंगदेह पिंडाकडे असेपर्यंत कावळा पिंडाला शिवत नाही. लिंगदेह तृप्त होऊन तेथून गेला की, कावळा शिवतो.) यालाच ‘कावळ्याने घास घेणे’, म्हणतात. अशा प्रकारे लिंगदेह आणि मानव यांच्यातील कावळा हा एक दुवा आहे.
प्राण्यांची बाजू घेणारी दुसरी बाजू पाहूया. हिंदूंच्या श्राद्धविधीच्या वेळी पिंडदान केल्यामुळे असंख्य कावळ्यांचे पोट भरत असेल, तर बुद्धीजीवींच्या पोटात का दुखते ? श्राद्धविधीतील पिंडदानाने कावळ्यांसमवेत अनेक पक्षांचेही पोट भरते. ‘कावळ्याला देण्याऐवजी गरिबाला द्या’, असे म्हणणारे वर्षाचे ३६४ दिवस काय करत असतात ?
४. अपप्रचार : मृत व्यक्ती कसे काय नैवेद्य खाणार ? त्याला शरीर असते का ? हे सर्व थोतांड आहे.
खंडण : हिंदु धर्म हा कर्म सिद्धांत मांडणारा आहे. पुनर्जन्माचा पुरस्कार करणारा एकमेव धर्म आहे आणि मृत्यूनंतरही जीवन असते, हे वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध झालेले आहे. अमेरिकेमध्ये ५ सहस्रांहून अधिक घटना पुनर्जन्माच्या समोर आल्या आहेत. भारतातही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. ‘डिस्कव्हरी’ या वाहिनीवर मृत्यूनंतरच्या जीवनासंबंधीच्या ध्वनीचित्रफिती दाखवण्यात आल्या आहेत. पूर्वजांना केलेल्या पिंडदानाच्या वासातून ते तृप्त होतात; कारण ते स्वतःही वायूरूप असतात, हे धर्मशास्त्र सांगते. (म्हणजेच मृताचा लिंगदेह वायूरूपात नैवेद्य ग्रहण करतो.) प्रत्यक्ष प्रभु श्रीरामचंद्र यांनी स्वतः त्यांच्या वडिलांचे म्हणजेच राजा दशरथ यांचे श्राद्ध केल्याची नोंद रामायणात मिळते. त्यामुळे प्रभु श्रीरामचंद्र यांनी जो आदर्श घालून दिला, त्याचे पालन आम्ही सदैव करत राहू. नास्तिकवाद्यांच्या बुद्धीभेदाला बळी न पडता हिंदूंनी श्राद्धविधी करण्यापासून वंचित राहू नये, हीच श्री गुरुचरणी प्रार्थना ! – श्री. विजय पाटील, वापी, गुजरात.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |