पुणे येथील शेख कुटुंबात गेल्या २० वर्षांपासून गणेशोत्सवाचे आयोजन !

गणेशाच्या कृपेने आजारातून बरे झाल्यावर घेतला निर्णय

मुसलमानांना हिंदूंच्या देवतांचे महत्त्व लक्षात येते; मात्र हिंदूंनाच हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व लक्षात न येणे दुर्दैवी आहे. कुठे मजारीवर माथा टेकवणे, तर कुठे अफझलखानाच्या थडग्याच्या ठिकाणी नवस बोलणे अशा कृती हिंदू करतात. कधी कधी हिंदू बंगाली बाबांच्या तावडीत सापडतात, तसेच धर्मांतरितही होतात. शेख कुटुंबियांचे उदाहरण हिंदूंच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारेच आहे. – संपादक

पुणे, १७ सप्टेंबर – येथील मंगळवार पेठेतील शेख कुटुंबात गेल्या २० वर्षांपासून गणेशोत्सव साजरा केला जातो. शेख कुटुंबीय प्रतिदिन श्री गणेशाची पूजा करतात. त्यांच्या घरात एका बाजूला कुराण, तर दुसर्‍या बाजूला ‘भगवद्गीता’ हे ग्रंथ ठेवलेले आहेत.

या कुटुंबातील मुमताज शेख यांनी सांगितले की, माझ्या धाकट्या मुलीच्या जन्माच्या वेळी मी आजारी पडले. माझा जीव वाचण्याची शक्यता अल्प असल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगितले. त्यानंतर मी गणेशाला प्रार्थना केली, ‘मी आजारपणातून बरी झाल्यावर घरी तुझी प्राणप्रतिष्ठा करीन.’ माझी ही प्रार्थना श्री गणेशाने ऐकली. त्यामुळे मी आजारातून ठणठणीत बरी झाले. तेव्हापासून आम्ही घरी गणेशोत्सव साजरा करण्यास प्रारंभ केला.