पुणे येथे कोरोनाच्या संसर्गाचे कारण पुढे करत प्रशासनाकडून श्री गणेशमूर्ती विसर्जनास बंदी; मात्र संकलन केंद्रावर तुडुंब गर्दी !

  • कोरोनाच्या संसर्गाचे कारण पुढे करत वहात्या पाण्यात विसर्जनास बंदी घालणार्‍या प्रशासनाला संकलन केंद्रांवरील गर्दी दिसत नाही का ? – संपादक 
  • विसर्जनासाठी शास्त्रविरोधी भूमिका घेऊन प्रशासनाने नेमके काय साध्य केले ? असा प्रश्न भाविकांच्या मनात आल्यास चूक ते काय ? – संपादक 
बिर्ला घाट चिंचवड येथील संकलन केंद्रावरील गर्दी

पुणे, १६ सप्टेंबर – कोरोनाच्या संसर्गाचे कारण पुढे करत प्रशासनाने भाविकांनी श्री गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यास मनाई केली होती. ‘या मूर्ती संकलन केंद्रांवर दान करा, फिरत्या रथावर विसर्जित करा; अन्यथा घरीच विसर्जन करा’, असे आवाहन प्रशासनाने केले होते. प्रत्यक्षात या सर्व नियोजनाचा फज्जा उडाला आणि सर्वच संकलन केंद्रांवर भाविकांची तुडुंब गर्दी झालेली पहावयास मिळाली.

१. बिर्ला घाट, चिंचवड येथील बाजू पत्रा लावून बंद केल्यामुळे येथील संकलन केंद्रावर गर्दी झाली, तसेच गणेश तलाव, प्राधिकरण येथील संकलन केंद्रे येथेही गर्दी झाली होती. सर्व ठिकाणचे विसर्जन घाट पूर्णपणे बंद करून त्या ठिकाणी संकलन केंद्रे चालू केली. तेथे सामाजिक अंतर पाळले जात नव्हते आणि गर्दीही मोठ्या प्रमाणात होती.

२. सर्वच विसर्जन घाटांवर भाविक मोठ्या संख्येने येत होते. त्यामुळे तेथे गर्दी होती. त्या ठिकाणी असलेले कर्मचारी, तसेच काही धर्मद्रोही संघटनांचे कार्यकर्ते हे ‘भाविकांनी घाटावर आरती करू नये’, असे आवाहन करत होते.

३. बिजलीनगर चिंचवड येथील हनुमान चौक येथे संकलन केंद्रातील मूर्ती ट्रॅक्टरमधून नेण्यात आल्या. श्री गणेशमूर्ती घेऊन जाण्यासाठी काही ठिकाणी फिरते रथ होते, तर काही ठिकाणी ट्रॅक्टरलाच महापालिकेचे फलक लावून त्यातून श्री गणेशमूर्ती नेण्यात येत होत्या.

४. वडगांव कॅनल, तसेच भोर येथील निरामाई घाटावर भाविकांना बाप्पांचे वहात्या पाण्यात विसर्जन करता आले.

मूर्तीदान करणे शास्त्रानुसार अयोग्य !

१. भाद्रपद मासातील श्री गणेशचतुर्थीस प्राणप्रतिष्ठापना केलेल्या मूर्तीचे विसर्जन करावे, असा शास्त्रोक्त विधी आहे.

२. देवतांचे दान घेणे किंवा देणे हा देवतांचा अपमान आहे. देवतांचे दान घेण्याचे किंवा देण्याचे सामर्थ्य मनुष्यात नाही.

३. मूर्ती म्हणजे एखादे खेळणे किंवा शोभिवंत वस्तू नव्हे की, जिचा उपयोग संपला; म्हणून ती दुसर्‍याला दान म्हणून दिली.

४. धर्मशास्त्रानुसार मूर्तीदान अयोग्य आणि अशास्त्रीय आहे. मूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करणेच योग्य आहे.

दान दिलेल्या मूर्तींचे काय होते ?

१. श्री गणेशभक्तांकडून विश्वासाने घेतलेल्या श्री गणेशमूर्तींचे धार्मिक पावित्र्य जपून विसर्जन होणे अपेक्षित असतांना तसे केले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे.

२. काही ठिकाणी कथित पर्यावरणवादी संघटना श्री गणेशमूर्ती जमा करतात आणि त्या मूर्ती पुन्हा गणेश मूर्तीकारांना विकतात. प्राणप्रतिष्ठा केलेल्या मूर्ती विसर्जन न करता थेट विक्री करणे, हे धर्मशास्त्रानुसार अयोग्य आहे.

३. काही ठिकाणी महापालिका प्रशासनच मूर्तींवर बुलडोझर फिरवून त्यांची विल्हेवाट लावते. अशाप्रकारे बुलडोझरने मूर्ती चिरडणे, ही श्री गणेशाची अक्षम्य आणि घोर विटंबना आहे.