वर्ष २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये गुन्ह्यांच्या प्रमाणात अल्प प्रमाणात घट !

सायबर गुन्ह्यांत मात्र मोठ्या प्रमाणात वाढ !

अल्प प्रमाणात नव्हे, तर देशातील गुन्हेगारी मुळासकट नष्ट झाली पाहिजे. यासाठी कठोर कायद्यांसह, तत्परतेने शिक्षा देणारी व्यवस्था निर्माण केली पाहिजे ! तसेच गुन्हेगारी वृत्तीच निर्माण होऊ नये, यासाठी प्रत्येकाला धर्मशिक्षण देऊन सुसंस्कारित होणे आवश्यक आहे. हे केवळ हिंदु राष्ट्रातच शक्य असल्याने त्याची स्थापना अपरिहार्य आहे ! – संपादक

 

नवी देहली – राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने वर्ष २०२० मध्ये देशातील गुन्ह्यांच्या संदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात वर्ष २०१९ च्या तुलनेत महिला आणि मुले यांच्या संदर्भातील गुन्हे काही प्रमाणात अल्प झाल्याचे दिसून आले आहे.

अपहरणाच्या गुन्ह्यांत घट

वर्ष २०१९ च्या तुलनेत वर्ष २०२० मध्ये अपहरणाच्या संख्येमध्येही घट झाली. वर्ष २०२० मध्ये ही संख्या ८४ सहस्र ८०५ होती, तर वर्ष २०१९ मध्ये ती १ लाख ५ सहस्र ३६ इतकी होती.

देशात प्रतिदिन बलात्काराच्या ७७ घटना !

या अहवालानुसार वर्ष २०२० मध्ये देशभरात एकूण ६६ लाख १ सहस्र २८५ गुन्हे नोंदवण्यात आले. त्यात प्रतिदिन सरासरी ७७ गुन्हे बलात्काराचे होते. वर्षभरात बलात्काराचे एकूण २८ सहस्र ४६ गुन्हे नोंदवण्यात आले. यात २५ सहस्र ४९८ पीडित या प्रौढ, तर २ सहस्र ६५५ अल्पवयीन मुली होत्या. हीच संख्या वर्ष २०१९ मध्ये अनुक्रमे ३२ सहस्र ३३, तर वर्ष २०१८ मध्ये ३३ सहस्र ३५६ होती. (बलात्कार्‍यांना तात्काळ शिक्षा होत नसल्याने बलात्काराच्या घटनांत वाढ होणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक)

सायबर गुन्ह्यांत वाढ !

इंटरनेटच्या माध्यमातून होणार्‍या गुन्ह्यांमध्ये मात्र वर्ष २०२० मध्ये वाढ झाली आहे. वर्ष २०१९ मध्ये ४४ सहस्र ७३५, तर वर्ष २०२० मध्ये ५० सहस्र ३५ इतक्या संख्येने गुन्हे नोंदवण्यात आले. यात ३० सहस्र १४२ केवळ फसवणुकीचे गुन्हे होते.

सरकारी आदेशाच्या उल्लंघनात प्रचंड वाढ

सरकारच्या आदेशाच्या उल्लंघनामध्ये प्रचंड वाढ झाली. वर्ष २०२० मध्ये एकूण ६ लाख १२ सहस्र १७९ गुन्हे नोंदवण्यात आले. वर्ष २०१९ मध्ये ही संख्या केवळ २९ सहस्र ४६९ इतकीच होती. कोरोनाच्या नियमावलीच्या उल्लंघनामुळे ही संख्या वाढल्याचे सांगण्यात आले आहे.