रावणप्रवृत्तीचे दहन व्हावे !

संपादकीय

एका मागोमाग एक हिंदुद्वेषी चित्रपट निर्माण होत असतांना सरकार ते रोखत का नाही ? – संपादक 

प्रतिकात्मक छायाचित्र

सध्याचा काळ प्रसिद्धीसाठी वाटेल ते करण्याचा आहे. मग ती प्रसिद्धी नैतिकतेला धरून असो किंवा नसो. इंग्रजीत एक म्हण आहे, ‘कुठलीही प्रसिद्धी ही चांगली प्रसिद्धी असते.’ याला धरूनच चित्रपटांची निर्मिती करण्याची प्रथा पडली आहे. अलीकडच्या काळात हिंदूंच्या धार्मिक भावनांना दुखावणार्‍या, तसेच राष्ट्रीय अस्मितेला छेद देणार्‍या चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. असे केल्याने आपोआपच वादंग निर्माण होतात आणि चित्रपट प्रसिद्धीच्या झोतात येतो. त्यासाठी निर्माते, दिग्दर्शक वेगळे कष्ट घेण्याच्या भानगडीत पडत नाहीत. लवकरच प्रदर्शित होणारा ‘रावण लीला’ चित्रपट हा याच पठडीतला असल्याचे दिसून येते. या चित्रपटाच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या विज्ञापनातून चित्रपटात किती चुकीच्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत, हे लक्षात येते. यामध्ये रावणाची भूमिका साकारणारा कलाकार प्रभु श्रीरामांची भूमिका साकारणार्‍या कलाकाराला म्हणतो, ‘तुम्ही माझ्या बहिणीचा (शूर्पणखेचा) अनादर केला; म्हणून मी तुमच्या स्त्रीचा (सीतेचा) अनादर केला; परंतु मी तुमच्याप्रमाणे तिचे नाक कापले नाही. तरीही लंका आमची जळली. आमचे भाऊ आणि मुले शहीद (हुतात्मा) झाली. सर्व परीक्षा आम्हीच दिल्या; पण जयजयकार मात्र तुमचा. असे का ?’ यावर प्रभु श्रीरामांची भूमिका साकारणारा कलाकार म्हणतो, ‘कारण आम्ही देव आहोत.’ असे अर्धसत्य सांगून या चित्रपटात हिंदूंची दिशाभूल केली आहे. मुळात प्रभु श्रीरामांनी शूर्पणखेचाच काय; परंतु कुठल्याची स्त्रीचा कधीही अनादर केलेला नाही. खरेतर शूर्पणखा प्रभु श्रीरामांकडे आकर्षित होऊन त्यांच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवते. एकपत्नी असलेले प्रभु श्रीराम तिला ते विवाहित असल्याचे नम्रपणे सांगतात. नंतर शूर्पणखा लक्ष्मणासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवते, तेव्हा लक्ष्मणही त्यास नकार देतो. यावर जेव्हा शूर्पणखा श्रीरामांचे वैवाहिक जीवन नष्ट करण्यासाठी सीतामातेला मारायला जाते, तेव्हा लक्ष्मण तिचे नाक कापतो, हा खरा इतिहास आहे. तरीही चित्रपटात मात्र धादांत खोटे सांगण्यात आले आहे. याउलट ‘रावणाने सीतामातेचे अपहरण करून स्त्रीचा कुठला सन्मान केला होता ?’, याचे उत्तर निर्मात्यांनी द्यायला हवे. एका स्त्रीच्या अनादराचा सूड दुसर्‍या स्त्रीचा अनादर करून कसा उगवला जाऊ शकतो ? मुळात शूर्पणखा ही राक्षसीण, तर सीता ही देवी होती. असे असतांना त्या दोघींची तुलना करणे चुकीचे नव्हे का ? एकूणच यातून प्रभु श्रीरामांना स्त्रीविरोधी ठरवण्याचा प्रयत्न दिसून येतो. या चित्रपटात हिंदूंचा मुख्य आक्षेप श्रीरामांच्या भूमिकेतील कलाकाराने दिलेल्या ‘कारण आम्ही देव आहोत’, या उत्तरावर आहे. यातून ‘श्रीराम देव असल्याने त्यांनी काहीही केले तरी चालते’, असे दाखवण्याचा संतापजनक प्रकार केला आहे. वास्तविक निर्मात्यांना श्रीरामांच्या भूमिकेतील कलाकाराला वस्तूस्थिती मांडतांना दाखवता आले नसते का ? पण त्यांनी ते जाणूनबुजून दाखवले नाही; कारण त्यांना रावणाचे उदात्तीकरण करायचे होते, हे सिद्ध होते. एकूणच या चित्रपटात वाईटाला चांगले दाखवण्याचा खटाटोप करण्यात आला आहे. हीसुद्धा एक प्रकारची रावणप्रवृत्तीच नव्हे का ?

या चित्रपटातील निर्मात्यांची आणखी एक चलाखी हिंदूंच्या दृष्टीतून सुटणारी नाही. या चित्रपटात ‘रामलीला’ ही नाट्यसंकल्पना दाखवण्यात आली आहे. या नाट्यात ‘रावणाची भूमिका साकारणारा कलाकार प्रत्यक्ष जीवनात सीतेची भूमिका साकारणार्‍या नायिकेच्या प्रेमात पडतो आणि यास गावकरी विरोध करतात’, असे दाखवण्यात आले आहे. यातून ‘रावण सीतेच्या प्रेमात पडतो, असे नसून रावणाची भूमिका वठवणारा नायक प्रत्यक्ष जीवनात सीतेची भूमिका साकारणार्‍या नायिकेच्या प्रेमात पडतो; परंतु गावकरी मात्र याकडे रावण-सीता यांचे प्रेम या दृष्टीकोनातून पहातात’, असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यातून ‘चित्रपटातील जीवन आणि प्रत्यक्ष जीवन यांच्यातील भेदही हिंदूंना कळत नाही अन् ते प्रेमाला विरोध करतात’, असा थेट संदेशच देण्यात आल्याचे निदर्शनास येते. यात चलाखी ही की, जेव्हा ‘रावण लीला’ या चित्रपटाला हिंदू विरोध करतील, तेव्हा त्यांनाही हेच सूत्र लागू होईल, अशी व्यवस्था निर्मात्यांनी अगोदरच करून ठेवलेली दिसून येते. चित्रपट क्षेत्रात हिंदुद्वेष किती पराकोटीला गेला आहे, हे यावरून लक्षात येते.

आता या चित्रपटाचे नाव पालटण्याचा साळसूदपणाचा आव निर्मात्यांनी आणला आहे; पण हे पुरेसे नाही; कारण चित्रपटाचे केवळ नावच नव्हे, तर मूळ गाभाच चुकीचा आहे. नाव पालटून काही साध्य होणार नाही. विषाच्या बाटलीचे नाव पालटून ‘साखर’ असे केले, तरी काही उपयोग आहे का ?

सरकारचे मौन दुर्दैवी !

आजच्या पिढीला रामायणात नेमके काय सांगितले आहे, हे ठाऊक नाही. शाळा-महाविद्यालयांतूनही त्याविषयी काही शिकवले जात नाही. अशा वेळी चित्रपटात जे दाखवले जाते, तेच त्यांना सत्य वाटते. या चित्रपटाद्वारे हिंदूंच्या भावी पिढीच्या मनात ‘रावण योग्य होता, तर श्रीराम चुकले होते’, हा चुकीचा संदेश रूजेल आणि म्हणूनच या चित्रपटाला हिंदूंचा विरोध आहे. भारताचे आराध्यदैवत असलेल्या प्रभु श्रीरामांना न्यून लेखून रावणाचे उदात्तीकरण करणार्‍या या चित्रपटाला खरेतर प्रमाणपत्रच कसे मिळते, हा प्रश्न आहे. धार्मिकतेचे ज्ञान नसलेल्यांना धार्मिक विषयाची निगडित चित्रपटांना प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नसावा. त्यासाठी श्रद्धावान व्यक्ती त्या पदावर हवी. जसे सैन्यावर चित्रपट काढायचा असेल, तर सैन्याधिकार्‍यांना तो दाखवावा लागतो, तसा नियम धार्मिक गोष्टींविषयीही असला पाहिजे. काही वर्षांपूर्वी ‘पीके’ या चित्रपटातूनही भगवान शिवाचे विडंबन करण्यात आले होते. एकूणच अशा चित्रपटांतून करमणूक नव्हे, तर निवळ हिंदुद्वेष दिसून येतो. येथे प्रश्न असा पडतो की, एका मागोमाग एक हिंदुद्वेषी चित्रपट निर्माण होऊनही सर्व यंत्रणा हाताशी असलेले सरकार ते रोखत का नाही ? अशी आणखी किती धर्महानी झाल्यावर सरकार पावले उचलणार आहे ? त्यामुळे आता हिंदूंनीच अशा हिंदुद्वेषी चित्रपटांवर बहिष्कार घालून संबंधितांना वैध मार्गाने त्यांची जागा दाखवून द्यावी ! याद्वारेच रावणप्रवृत्तीचे दहन होऊ शकते. एकूणच ‘रामचंद्र कह गए सिया से, ऐसा कलयुग आएगा, हंस चुगेगा दाना-दुनका, कौआ मोती खाएगा’, या गीताप्रमाणे कलियुगातील विकृती डोके वर काढत आहे, दुसरे काय ?