बोगस शिक्षक भरती होणेच गंभीर आणि चिंताजनक आहे. यामध्ये सहभागी असणार्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे. – संपादक
पुणे – बोगस शिक्षक भरती प्रकरणी आकुर्डी येथील ‘नवनगर शिक्षण मंडळ’ या संस्थेचे संस्थाचालक, अधिकारी आणि शिक्षक यांसहित २८ जणांच्या विरोधात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विभागीय शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग यांच्या मान्यतेने साहाय्यक पोलीस आयुक्त (आर्थिक आणि सायबर गुन्हे) यांनी गुन्हा नोंद केला होता; मात्र आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनीच बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाचे पुढील अन्वेषण करण्यास अनुमती मागितली होती; मात्र विभागीय चौकशी नियमपुस्तिका १९९१ मधील तरतुदीअन्वये वर्ग १ आणि २ च्या अधिकार्यांविरुद्ध चौकशीची गोष्ट उपस्थित होत असल्यास, त्याकरता संबंधित प्रशासकीय विभागाच्या सचिवांची सहमती आवश्यक असते, असे नमूद करीत शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिव चारुशीला चौधरी यांनी चौकशीस नकार दिला होता. मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडून तरतुदींचे उल्लंघन झाले आहे. त्याविरोधात संबंधित अधिकार्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे केल्या आहेत.