गणेशभक्तांनो, सार्वजनिक गणेशोत्सवाचे बाजारीकरण थांबवून ‘एक गाव, एक उत्सव’, असा उत्सव साजरा करा आणि श्री गणेशाची आराधना करून त्याची कृपा संपादन करा !

१. श्री गणपतीला भक्तीने प्रसन्न करून घेण्यापेक्षा सार्वजनिक गणपतीचे काही सेकंद दर्शन घेण्यासाठी अनेक घंटे वेळेचा अपव्यय करणारा उत्सवप्रिय मनुष्य !

‘उत्सवांच्या दिवसांत मनुष्य उत्साहाच्या भरात काहीतरी नवीन गोष्टी चालू करतो आणि नंतर त्यांचा अतिरेक होऊन त्याचे दुष्परिणाम सगळ्यांनाच भोगावे लागतात. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी तर ‘सार्वजनिक गणपतीवर फारच मोठे अरिष्ट आले आहे’, असे गृहित धरून गर्दी करणार्‍यांना वठणीवर आणण्यासाठी आणि गणपतीचे किंचित दर्शन देण्यासाठी कार्यकर्त्यांना पोलीस अन् निमलष्करी दल यांची व्यवस्था करावी लागते. त्यासाठी होणारा व्यय भक्तच उचलत असतात. हे भक्त असा विचार करत नाहीत की, घरीच श्री गणपतीची सेवा, प्रार्थना आणि नामस्मरण करून त्याला प्रसन्न करून घ्यायचे सोडून एवढे कष्ट अन् हाल सोसून अनेक घंटे रांगेत ताटकळत उभे राहून काही सेकंद दर्शन घेण्याचा एवढा मोठा खटाटोप आपण कशासाठी करतो आणि त्यातून काय मिळवतो ?’

२. ‘गणपति’ हा उपासनेचा विषय आहे’, याचे विस्मरण झाल्याने गणेशोत्सवात प्रचंड पैसा आणि श्रम वाया घालवले जाऊन त्याला ओंगळवाणे स्वरूप प्राप्त होणे

‘गणपति’ हा केवळ उत्सवाचा विषय नसून उपासनेचा विषय आहे. उपासनेचा उद्देशच शांतता निर्माण करणे, राग, लोभ आदी गोष्टींवर विजय मिळवणे, हा असतो. सध्या उत्सवातील देवत्व, ईश्वराची मनोभावे आणि आर्ततेने करायची आराधना, सामाजिक बांधीलकी, सलोखा, एकोपा अन् परोपकार या गोष्टींचा लोप होऊन त्याला ओंगळवाणे अन् किळसवाणे स्वरूप आले आहे. हे सर्व उघड्या डोळ्यांनी बघतांना भाविक लोकांना पुष्कळ यातना होतात. उत्सवासाठी आरास, फुले-फळे, पक्वान्ने, भजने, सांस्कृतिक कार्यक्रम यांवर प्रचंड पैसा आणि श्रम वाया घालवले जातात. सार्वजनिक मंडळे उत्सवात विघ्न येऊ नये; म्हणून पोलीस, कार्यकर्ते, सुरक्षारक्षक, ‘सीसीटीव्ही कॅमेरा’ यांवर प्रचंड व्यय करतात अन् ‘उत्सव थाटामाटात आणि निर्विघ्नपणे पार पडला’, असे म्हणून टेंभा मिरवतात.

३. सध्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे झालेले बाजारीकरण !

सध्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाकडे पाहिले, तर त्याचे बाजारीकरण झालेले दिसते. ‘अमक्या तमक्याचा किंवा अमक्या विभागाचा राजा’, असे त्याचे नामकरणही झालेले दिसते. त्यातून पैशाचा प्रचंड अपव्यय होत असतो. जाहिरातबाजी आणि विविध देखाव्यांची मोठी विज्ञापने करून प्रचंड गर्दी खेचली जाते. गणेशोत्सव चालू होण्यापूर्वी वर्गणीच्या (खंडणीच्या) नावाखाली मोठमोठाले आकडे टाकून पैसे गोळा करून गुन्हेगारी आणि व्यसने यांची पाळेमुळे लहानांपासून थोरांपर्यंत रुजवली जातात, जी पुढे जाऊन भयानक रूप धारण करतात.

४. उत्सवांतील अयोग्य गोष्टींमुळे सामाजिक स्तरावर होणारे दुष्परिणाम

उत्सवांच्या वेळी मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण होते. सार्वजनिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष होते आणि रस्ते अन् वाहतूक याची संपूर्ण कोंडी होते. या काळात वीज आणि पाणी यांचा अनिर्बंध वापर केला जातो.

५. ‘एक गाव एक उत्सव’, अशा प्रकारे उत्सव साजरा करून पैशांचा अपव्यय टाळणे, हीच काळाची निकड !

‘एक गाव एक उत्सव’, ‘एक शहर दोन उत्सव’ किंवा असेच काही करून उत्सवांची परंपरा सीमित करण्याचा विवेक दाखवणे, ही काळाची निकड आहे. त्यात सर्वांचेच भले आहे आणि यातच आर्थिक बचतही आहे.

अ. असे केल्यामुळे उगाचच होणारा वारेमाप व्यय, वाढती गुन्हेगारी आणि व्यसनाधीनता रोखता येईल.

आ. त्यातून निर्माण होणार्‍या समाजविघातक प्रवृत्ती न्यून होतील.

इ. ध्वनी आणि पर्यावरण यांचे प्रदूषण टाळता येईल.

ई. पूजेसाठी होणारी वनस्पतींची प्रचंड तोड, तसेच फळाफुलांची नासाडी थांबवता येईल.

उ. ठिकठिकाणच्या गर्दीमुळे उत्सवाच्या काळात आणि विर्सजनाच्या वेळी निर्माण होणारा प्रचंड ताणतणाव अन् त्यावर होणारा व्यय टाळता येईल.

एकूणच समाजाच्या हिताच्या दृष्टीने या सर्व गोष्टींचा साकल्याने आणि प्रचंड इच्छाशक्तीने विचार होणे आवश्यक आहे.

६. गणेशोत्सवाच्या निमित्ताने श्री गणपति भाविकांना काय संदेश देत असेल ?

श्री गणपतीच्या मूर्तीतील आशीर्वाद देणारा हात आपल्याला असे तर सांगत नाही ना की, ‘सध्या जे काय चालले आहे, ते त्वरित थांबवा. उत्सवात आरास, मिरवणुका, देखावे, रोषणाई, गाणे वाजवणे आदी बाह्य गोष्टींना महत्त्व न देता ‘माझी पूजा व्यवस्थित होत आहे कि नाही ? आरती आर्ततेने म्हटली जाते कि नाही ?’, हे पहा ! ‘माझे देवत्व टिकेल’, असे काहीतरी करत आहात का ? माझी आराधना आणि उपासना करायला आरंभ करा अन् माझे भरभरून आशीर्वाद घ्या !’

– श्री. श्यामसुंदर श्रीपाद सामंत (साभार : मासिक, ‘श्रीमत् पूर्णानंदाय नमः’, दिवाळी विशेषांक २०१३)