ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून १२७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार ! – भाजपच्या किरीट सोमय्या यांचा आरोप

डावीकडून किरीट सोमय्या आणि हसन मुश्रीफ

मुंबई, १३ सप्टेंबर – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी १२७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. खोट्या आस्थापनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळे करून बेनामी संपत्ती जमा केली आहे. या संदर्भात माझ्याकडे २ सहस्र ७०० पृष्ठांचे पुरावे असून ते मी आयकर विभागाला सोपवले आहेत, अशी माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी किरीट सोमय्या म्हणाले की,

१. केवळ हसन मुश्रीफच नाही, तर त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या नावे हे पुरावे आहेत.  यासंदर्भात मी १४ सप्टेंबरला ‘ईडी’कडे अधिकृत तक्रार प्रविष्ट करणार आहे.

२. हसन मुश्रीफ यांच्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या पत्नीच्या खात्यात ‘सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्या’चे ३ लाख ७८ सहस्र ३४० रुपयांचे शेअर्स दाखवण्यात आले आहेत. मुश्रीफ परिवाराकडे आयकर विभागाने शोध मोहीम राबवली होती.

३. यात १४७ कोटी रुपयांचे पुराव्यानिशी बेनामी व्यवहार सिद्ध झाले आहेत. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबाने सर सेनापती संताजी साखर कारखान्यात १०० कोटी रुपयांहून अधिक पैसा गुंतवला आहे.

माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे ! – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर – या संदर्भात कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘‘माझ्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप तथ्यहीन आहेत. किरीट सोमय्या यांना काहीही माहिती नाही. त्यानी कागल, कोल्हापूर येथे येऊन माहिती घ्यावी. या संदर्भात मी सोमय्या यांच्यावर १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा लावणार आहे.