- ‘एक गाव एक गणपति’ची संकल्पना सर्व जिल्ह्यांत राबवणे आवश्यक आहे !
- पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद !
हिंगोली – ‘एक गाव एक गणपति’ संकल्पना राबवण्याविषयी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. गणेशोत्सव मंडळांनी जिल्ह्यांमध्ये २९६ ठिकाणी ‘एक गाव एक गणपती’ची स्थापना केली आहे. जिल्ह्यात श्री गणेशमूर्तींची शांततेत स्थापना करण्यात आली आहे. गेल्या १५ दिवसांपासून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे आणि साहाय्यक पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी गणेशोत्सव मंडळ अन् शांतता समिती यांच्या बैठका घेऊन ‘कोविड’च्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
‘एक गाव एक गणपति’ या संकल्पेनेमुळे गावांमधून श्री गणेशमूर्ती पहाण्यासाठी होणारी गर्दी अल्प होणार आहे. त्यातून सामाजिक अंतराचे पालनही होणार आहे. जिल्ह्यामध्ये एकूण ९८० ठिकाणी श्री गणेशमूर्तींची स्थापना झाली आहे. यामध्ये शहरी भागांत २४९ ठिकाणी, तर ग्रामीण भागामध्ये ७३१ ठिकाणी श्री गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. गणेशोत्सवात मिरवणुकीला अनुमती नाकारण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी साध्या पद्धतीने श्री गणेशमूर्तींची स्थापना केली आहे. जिल्ह्यात गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी, तसेच संवेदनशील भागांत पोलिसांचा पहारा चालू करण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांसह राज्य राखीव दल अन् गृहरक्षक दल यांचे सैनिक तैनात करण्यात आले आहेत.