१० सप्टेंबर या दिवशी गणरायाचे आगमन झाले. गणेशोत्सवाच्या काळात पृथ्वीतलावर श्री गणेशतत्त्व १ सहस्र पटींनी कार्यरत असते. याचाच परिणाम म्हणून सर्वत्र आनंद आणि उत्साह जाणवतो. एकूणच या कालावधीत सर्वत्र गणेशमय मंगलमय वातावरण असते. सर्व हिंदूंना ‘श्री गणेशच आपल्या घरी आलेला आहे’, असे वाटत असते. सर्व जण त्या भावाने श्री गणेशाची मनोभावे पूजा करणे, त्याला नेवैद्य दाखवणे, प्रतिदिन सकाळ-सायंकाळ आरती करणे, असे करण्याचा प्रयत्न करतात. काही जणांकडे दीड दिवसाचा, तर काही जणांकडे ५ दिवसांचा गणपति असतो. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणपति तर अनंत चतुर्दशीपर्यंतही असतात. अशा प्रकारे पूजन केलेल्या श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याचा दिवस येतो.
श्री गणेशाविषयी आपल्या मनात कितीही प्रेम असले, तरी अध्यात्मशास्त्रानुसार श्री गणेशाचे विसर्जन करावेच लागते. हे विसर्जन शास्त्रानुसार वहात्या पाण्यातच केल्यास श्री गणेशाच्या मूर्तीमधील सात्त्विकता पाण्याद्वारे सर्वत्र पसरते आणि त्याचा लाभ भाविकांना होतो. असे असले तरी महान संस्कृती असलेल्या भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये अंनिससारख्या संस्था भाविकांना प्रदूषणाच्या नावाखाली श्री गणेशमूर्तींचे दान किंवा हौदात विसर्जन करण्यास भाग पाडतात. श्री गणेशमूर्तीमुळे प्रदूषण होत नाही, त्यामुळे भाविकांनी वहात्या पाण्यातच ती विसर्जन करावी.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करतांना मंडळातील कार्यकर्त्यांना पुष्कळ उत्साह असतो. त्यामुळे ते उत्साहाच्या भरात चित्रपटातील गाण्यांच्या तालावर नाचणे, मद्य पिऊन मिरवणुकीत धिंगाणा घालणे, असे प्रकार करतात. असे प्रकार करणे चुकीचे आहे. अशा प्रकारच्या कृतीतून आपण श्री गणेशाची कृपा संपादन करून घेण्याऐवजी अवकृपाच ओढवून घेतो. ज्या श्री गणेशमूर्तीची आपण मनोभावे पूजन करून त्यामध्ये गणेशतत्त्व जागृत केलेले असते, त्याच श्री गणेशाच्या मूर्तीसमोर अशा प्रकारे धिंगाणा घालणे अयोग्य आहे. जे अशा प्रकारे अयोग्य कृती करतात, ते पापाचे भागीदार होतातच; परंतु हे पाहूनही जे काही कृती करत नाहीत, तेही पापाचे भागीदार होतात, हे लक्षात घेऊन श्री गणेशोत्सवातील मिरवणुका आदर्श कशा होतील, यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्याने धार्मिक उत्सवाचे ज्ञान नाही, हे दुर्दैवी आहे. हिंदु राष्ट्रात सर्व सण आणि उत्सव धर्मशास्त्रानुसार साजरे केले जातील.
– वैद्या (कु.) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल