महाराष्ट्रात कोरोनाबाधित बालकांमध्ये एका मासात ४ टक्क्यांनी वाढ

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई – राज्यात कोरोनाबाधित मुलांच्या संख्येत एका मासात ४ टक्क्यांनी वाढ झाल्याचे आढळले आहे. या काळात ११ वर्षांवरील सर्वाधिक १८ सहस्र ४१३ बालकांना संसर्ग झाला आहे.

१. राज्यात जुलैपर्यंत १० वर्षांखालील २ लाख १८, तर ११ वर्षांवरील ४ लाख ६३ सहस्र बालकांना कोरोनाची बाधा झाली होती. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ६ सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार १० वर्षांखालील ६ सहस्र ७३८ बालकांना नव्याने कोरोनाची लागण झाली असून बाधित बालकांच्या संख्येत ३.३६ टक्क्यांनी वृद्धी झाली आहे. ११ वर्षांवरील बालकांमध्ये संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात या वयोगटातील १८ सहस्र ४१३ बालके बाधित झाल्याचे आढळले असून बाधित बालकांच्या संख्येत ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

२. मुंबईत एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत १० वर्षांखालील बालकांचे बाधित होण्याचे प्रमाण २ टक्के, तर ११ वर्षांवरील बालकांचे ४.६४ टक्के आहे. आतापर्यंत १० वर्षांखालील १९ आणि ११ वर्षांवरील ४१ बालकांचा मृत्यू झाला आहे.

३. बालके बाधित झाली, तरी यातील ८० टक्के ही घरीच बरी होणार आहेत. रुग्णसंख्या वाढली, तरी यातील ३ ते ४ टक्के बालकांनाच रुग्णालयात भरती करण्याची वेळ येईल, तर १ ते २ टक्के बालकांमध्ये संसर्गाची तीव्रता अधिक असेल. बालकांसाठी सर्व सुविधाही उपलब्ध केलेल्या आहेत. त्यामुळे पालकांनी घाबरून जाऊ नये, असे बालकांच्या कोरोना कृतीदलाचे प्रमुख डॉ. सुहास प्रभू यांनी सांगितले.