श्री गणेशाप्रती भाव वाढवूया !

नोंद 

गणेशचतुर्थी म्हटले की, सर्वत्रचे वातावरण मंगलमय होऊन जाते. या कालावधीत श्री गणेशतत्त्व पृथ्वीवर १ सहस्र पटीने कार्यरत असते. अनेकांच्या घरामध्ये श्री गणरायाच्या आगमनाचा आनंदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. खरेतर प्रत्येक सण आणि उत्सव यांचा उद्देश त्या संबंधित देवतेप्रती आपल्या मनातील भक्ती भाव वाढावा, हाच असतो. कोणतेही मंगलकार्य असेल किंवा पूजा करायची असेल, तर सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा केली जाते. गणपति हा दहा दिशांचा स्वामी असल्याने त्याच्या पूजनामुळे शुभकार्यात येणारी विघ्ने दूर होतात. त्यामुळे गणेशचतुर्थीच्या निमित्ताने विघ्नहर्त्या श्री गणेशाप्रती आपण कृतज्ञताभाव वाढवूया.

‘भाव तिथे देव’, असे शास्त्र असल्याने आपल्या अंत:करणात भाव असल्यास सण आणि उत्सव यांच्या माध्यमातून देवतेचे तत्त्व अनुभवता येते. त्यामुळे गणेशचतुर्थीच्या निमित्ताने ‘आपल्या घरी गणरायाचे प्रत्यक्ष आगमन झाले आहे’, असा भाव ठेवून त्याच्यासाठी प्रत्येक कृती करण्याचा प्रयत्न करूया. गणेशासाठी हार तोरण बनवणे, पूजा करणे, नेवैद्य बनवणे अशा कृती करतांना ‘साक्षात् श्री गणराया हे सर्व पहाणार आहे आणि तो नैवेद्य ग्रहण करणार आहे’, असा भाव ठेवून केल्यास या कृतींतून गणेशतत्त्व अधिक प्रमाणात ग्रहण करता येईल. धर्मशास्त्रात श्री गणेशमूर्तीच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंतच्या प्रत्येक धार्मिक कृतीमागे सर्व प्राणिमात्रांना श्री गणेशाचे चैतन्य मिळावे, हाच सूक्ष्म विचार केलेला आहे. त्याचा भावाच्या स्तरावर अधिकाधिक लाभ करून घेऊया.

गणपति ही बुद्धीची देवता आहे. आपली बुद्धी शुद्ध आणि सात्त्विक असल्यास मनात अयोग्य विचार न येता आपल्या हातून अलौकिक कार्य घडू शकते. त्यामुळे कुटुंबातील सर्वांनीच बुद्धीदात्या श्री गणरायाला बुद्धी शुद्ध आणि सात्त्विक होण्यासाठी प्रार्थना करण्यास सांगूया. केवळ गणेशचतुर्थीनिमित्त हा भाव न ठेवता तो वर्षभर टिकवून ठेवल्यास श्री गणेशाचा आशीर्वाद आणि त्याची कृपा आपल्यावर अखंड रहाणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत करण्यात येणार्‍या विविध धार्मिक कृतींमागील शास्त्र समजून घेऊन त्याला भावाची जोड दिल्यास श्री गणेशाची कृपा निश्चितपणे संपादन होईल आणि खर्‍या अर्थाने गणेशचतुर्थीचा उद्देश साध्य होईल.

– वर्षा कुलकर्णी, सोलापूर