शासन कसे असावे, याचा आदर्श पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याकडून शासनकर्त्यांनी घ्यावा ! – श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे १३ वे वंशज

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ धर्मसंवादाचे आयोजन

श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर

इंदूर (मध्यप्रदेश) – राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी देशभरात अनेक लोकोपयोगी कामे केली. त्यांनी आवश्यकतेप्रमाणे रणभूमीमध्ये शत्रूशी सामनाही केला. जेथे बळाचा वापर करणे आवश्यक आहे, तेथे बळाचा वापर करावा आणि जेथे जनहिताची कामे करणे आवश्यक आहे, तेथे तेच करावे, हे त्यांच्या चरित्रातून शिकता येते. एवढेच नाही, तर जनतेविषयी प्रेमभाव, शत्रूशी चिकाटीने सामना करण्याची शक्ती आणि स्वाभिमान असणारे शासन कसे असावे, याचा आदर्श आजच्या शासनकर्त्यांनी त्यांच्याकडून घ्यावा, असे प्रतिपादन राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे १३ वे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्याबाई यांची ६ सप्टेंबर या दिवशी पुण्यतिथी होती. त्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती आयोजित विशेष धर्मसंवादात ते बोलत होते. या वेळी समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे श्री. कार्तिक साळुंके यांनी केले.

श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर पुढे म्हणाले की,

१. भारताच्या इतिहासामध्ये केवळ चारच लोकांना ‘पुण्यश्लोक’ ही उपाधी देण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वप्रथम भगवान श्रीविष्णु, त्यानंतर राजा नल, राजा युधिष्ठिर आणि कलियुगामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनाच ही उपाधी देण्यात आली आहे. ज्यांचे चरित्र निष्कलंक होते, ज्यांनी मनुष्य, पशू आणि पक्षी यांची वात्सल्यभावाने काळजी घेतली अन् जे सत्यवचनी होते, अशा व्यक्तींना ‘पुण्यश्लोक’ म्हटले गेले आहे.

२. पुण्यश्लोक अहिल्याबाई यांनी जनतेला सुराज्य देण्यासाठी केलेले प्रयत्न !

अहिल्याबाई यांनी एक प्रशासक म्हणून अतिशय कुशलतेने राज्यकारभार सांभाळला. त्यांनी प्रजेला एक चांगले शासन देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्याकडे एक ‘यशस्वी प्रशासक’ म्हणून पाहिले जाते. त्यांनी व्यापारासह मुले आणि महिला यांना सुरक्षित जीवन जगण्यासाठी, अर्थव्यवस्था विकसित करण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केले. त्यांनी हिंदुस्थानभर लोकोपयोगी कार्य केले. अहिल्याबाई यांनी देशातील प्रमुख मंदिरांचा जिर्णाेद्धार केला. मंदिरांचा जिर्णाेद्धार करण्यामागे त्यांची केवळ धार्मिक भावना नव्हती. त्या काळी मंदिरे ही आर्थिक केंद्रेही होती. मंदिरांच्या सभोवती संपूर्ण अर्थव्यवस्था केंद्रित होती. मंदिरांच्या आजूबाजूला असणार्‍या गावांमधून मोठ्या प्रमाणात नागरिक मंदिरांमध्ये दर्शनाला यायचे. असे भाविक आणि व्यापारी यांच्या सुविधेसाठी त्यांनी मंदिरांचा जिर्णाेद्धार केला. त्यांनी लोकांच्या येण्या-जाण्याच्या मार्गांवर विहिरी-तलाव बनवले, धर्मशाळा बांधल्या आणि अन्नछत्रे चालू केली. त्यांनी जनतेच्या हिताचे कार्य करत एका शांतीप्रिय राज्याची निर्मिती केली.

३. पुण्यश्लोक अहिल्याबाई यांनी निर्माण केलेला वारसा जतन करणे आवश्यक !

आजच्या परिस्थितीमध्ये अहिल्याबाई यांचे कार्य महत्त्वाचे आहे. संपूर्ण भारतात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. अहिल्याबाई यांच्या काळातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाहिली, तर आजही त्यांनी बनवलेल्या विहिरी लोकांना पाणी पुरवत आहेत. त्यामुळे त्यांनी निर्माण केलेले तलाव, पाण्याचे कुंड यांना सरकारच्या साहाय्याने विकसित केले पाहिजे. आपण त्यांनी उभारलेली मंदिरे, विहिरी, कुंड, तलाव यांची देखभाल केली, तर ‘शासक कसा असावा’, हे येणार्‍या पिढ्यांना शिकायला मिळेल. आम्ही हा इतिहास भावी पिढ्यांना सांगितला नाही, तर आपली संस्कृती आपण गमावून बसू. त्यामुळे आपल्या महापुरुषांविषयी आपली मुले आणि कुटुंब यांना जागृत करणे आवश्यक आहे.

हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी प्रयत्न करणे, हीच पुण्यश्लोक अहिल्याबाई यांना श्रद्धांजली ठरेल ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

वर्ष १७६६ ते १७९५ या कालावधीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी माळवा प्रदेशावर राज्य केले. त्यांच्या राज्यात प्रजा सुखी आणि समाधानी होती. अहिल्याबाई होळकर यांना ‘पुण्यश्लोक’ आणि ‘धर्मपरायण शासनकर्ता’ म्हणून देश-विदेशांत ओळखले जाते. त्या परम शिवभक्त होत्या. प्रतिदिन शिवपूजा करून त्यांनी स्वयंचैतन्याची प्राप्ती केली होती. त्याच्या बळावर त्यांनी राज्यकारभार सांभाळला होता. ‘ईश्वराची चित्शक्ती सदैव कार्यरत असते’, हे लक्षात घेऊन त्या सदैव शिवपिंड समवेत ठेवत असत. या चैतन्याचा लाभ जनतेलाही मिळावा, यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी शिवमंदिरांची स्थापना केली, तसेच १२ ज्योतिर्लिगांचा जिर्णाेद्धार केला. त्यांनी परकीय आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेले श्री सोमनाथ मंदिर आणि काशीचे विश्वनाथ मंदिर यांचा जिर्णाेद्धार केला. त्यांच्यामुळेच आपली मंदिरे, तीर्थक्षेत्रे आणि हिंदु धर्म सुरक्षित राहू शकला. राजा धर्माचरणी असेल, तर प्रजाही धर्माचरणी असते. धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था हीच योग्य राज्यव्यवस्था असते. अशी राज्यव्यवस्था, म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याचा संकल्प करणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे, हीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांना श्रद्धांजली ठरेल.