सातारा, ८ सप्टेंबर (वार्ता.) – सध्या गणेशोत्सवामुळे शहरातील खण आळी, खालचा रस्ता परिसर यांमध्ये नागरिक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. त्यामुळे शहर वाहतूक शाखेच्या वतीने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोरोना नियमांचे पालन न करणार्या नागरिकांची जागेवरच आर्.टी.पी.सी.आर्. तपासणी करण्यात येत आहे.
याविषयी सातारा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार म्हणाले की, गणेशोत्सवामुळे नागरिक खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी करत आहेत. या वेळी सर्वच नागरिक कोरोनाची नियमावली पाळत आहेत, असे नाही. मास्क, सुरक्षित अंतर यांविषयी नागरिक उदासीन आहेत. यामुळे वाहतूक शाखेच्या वतीने नियम न पाळणार्या नागरिकांची जागेवरच आर्.टी.पी.सी.आर्. तपासणी करत आहे. जे नागरिक बाधित आढळतील त्यांची रवानगी विलगीकरण कक्षात करण्यात येत आहे. या मोहिमेमुळे नागरिक जागृत होऊन गर्दी टाळतील, मास्कचा उपयोग करतील, सामाजिक अंतर राखतील, अशी आशा आहे.