तालिबान आणि पाकिस्तान यांची युती भारतासाठी धोकादायक ! – सी.आय.ए.चे माजी प्रमुख डग्लस लंडन

तालिबानी आतंकवादी (प्रातिनिधिक छायाचित्र)

वॉशिंग्टन (अमेरिका) – पाकिस्तान आणि तालिबान यांची युती भारतासाठी धोकादायक आहे, असे मत अमेरिकेची गुप्तचर संस्था सी.आय.ए.चे माजी प्रमुख डग्लस लंडन यांनी व्यक्त केले आहे. तालिबानला पाकिस्तानकडून साहाय्य होत असल्याचे आता जगजाहीर झाले आहे. त्यातच अफगाणिस्तानमधील पंजशीर प्रांत कह्यात घेण्यासाठी  तालिबानच्या साहाय्यासाठी पाकिस्तानने ड्रोनद्वारे आक्रमण केल्याने त्यांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले. या पार्श्‍वभूमीवर डग्लास लंडन बोलत होते.

लंडन म्हणाले की,

१. पाकिस्तानचा तालिबानला पाठिंबा आणि पाकिस्तानी सैन्याचे हक्कानी नेटवर्कसमवेतचे संबंध हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे. तालिबानसह इतरही आतंकवादी संघटनांना पाकिस्तान पाठिंबा देतो. पाकिस्तानचे हे धोरण भारत-पाकिस्तान संबंधातील राजकारणाच्या दृष्टीकोनातून ठरवले जाते. पाकिस्तानला भारताचा धोका वाटतो आणि पाकिस्तान कोणतेही सूत्र अन् आव्हाने याच दृष्टीकोनातून पहातो.

२. भारत आणि चीन यांच्यातही तणाव आहे. चीन पाकिस्तानचा जवळचा सहकारी आहे. चीनकडून अफगाणिस्तानसमवेत चांगले संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न चालू आहेत; मात्र उघूर मुसलमान फुटीरतावाद्यांना तालिबानने आश्रय दिल्यास चीनच्या अडचणीत वाढ होऊ शकते. असे होऊ न देण्यासाठी चीन तालिबानवर दबाव टाकेल.

३. तालिबान इतर आतंकवादी संघटनांना पाठबळ देण्याचा विचार करू शकतो. तालिबान हा लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद यांसारख्या संघटनांसमवेत असलेले संबंध तोडण्याची शक्यता अल्प आहे. त्यामुळे भारत आणि मध्य आशिया यांच्यासाठी ही गोष्ट चिंताजनक ठरू शकते.

४. पाकिस्तानने पाठिंबा दिलेले आतंकवादी गट त्याच्या नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे, तर हे पाकिस्तानच्या सैनिकी वर्चस्वालाही धोकादायक ठरू शकते.

डग्लस यांनी लिहिलेल्या ‘द रिक्रूटर : स्पाययिंग अँड द लॉस्ट आर्ट ऑफ अमेरिकन इंटेलिजन्स’ या पुस्तकात ‘वर्ष २०२० मध्ये अमेरिका-तालिबान यांच्यात झालेला शांतता करार हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत वाईट करार आहे’, असे त्यांनी नमूद केले आहे.