अतिशय गर्दी असूनही गुरुकृपेमुळे गाभार्‍यात जाऊन काशी विश्वनाथाचे दर्शन घेता येणे

काशी विश्‍वनाथाचे ज्योर्तिलिंग

१. काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठीची गर्दी पाहून दर्शन न घेता परतण्याचा विचार करणे; परंतु आश्रमातून निघतांना पू. निलेश सिंगबाळ यांनी शिवाला वहाण्यासाठी दिलेली बिल्वपत्रे अर्पण करण्यासाठी दर्शनाच्या रांगेत उभे रहाणे

‘१९.३.२०१९ या दिवशी काशी विश्वनाथाच्या दर्शनाला जाण्याचे अचानक ठरले. पूर्वनियोजन नसल्यामुळे सेवाकेंद्रातून निघायला दुपार झाली होती. तेव्हा माझ्या आणि सहसाधकांच्या मनांत नकारात्मक विचार आले; कारण त्या दिवशी सोमवार असल्यामुळे मंदिरात प्रचंड गर्दी असल्याने ‘दर्शन होईल कि नाही ?’, अशी शंका होती. आम्ही ‘दर्शनाचा लाभ मिळू दे’, अशी प्रार्थना करून निघालो. सोमवार आणि होळीचा आदला दिवस असल्यामुळे सर्व घाटांवर अन् मंदिराच्या आवारात पुष्कळ गर्दी होती. त्यामुळे आमच्या मनात दर्शन न घेताच परत जाण्याचा विचार आला होता; परंतु सेवाकेंद्रातून निघतांना सनातन संस्थेचे संत पू. निलेश सिंगबाळ यांनी बिल्वपत्रे देऊन सांगितले होते, ‘ही शिवाला अर्पण करा.’ त्यामुळे आम्ही दर्शनाच्या रांगेत उभे राहून गाभार्‍याजवळ आल्यावर विश्वनाथाचे बाहेरूनच दर्शन घेतले.

२. मंदिर नियोजन समितीच्या कार्यकर्त्याने संस्थेचा परिचय विचारून महाआरतीनंतर गाभार्‍यात जाण्यास सांगणे आणि हे दैवी नियोजन असल्याचे लक्षात येणे

आम्ही मंदिराच्या बाहेर आल्यावर मंदिर नियोजन समितीच्या एका कार्यकर्त्याने ‘तुम्ही कोणत्या संस्थेकडून आला आहात ?’, अशी आमची विचारपूस केली. त्याचे ते बोलणे ऐकून आमच्या मनांत शंका आली, ‘हा अनोळखी माणूस आमची विचारपूस का करत आहे ?’ आम्ही संस्थेचा परिचय सांगितल्यावर त्याने आम्हाला ‘तुम्ही जरा थांबा’, असे सांगितले आणि (अंगुलीनिर्देश करून) म्हणाला, ‘‘महाआरती नंतर या बाजूने गाभार्‍यात जा. तुमच्यावर बाबांची (काशी विश्वनाथाची) कृपा आहे.’’ नंतर मनात विचार आला, ‘काशी विश्वनाथाने त्याचे दर्शन व्हावे; म्हणून या द्वारपालाला आपल्याकडे पाठवले आहे.’ (हे दैवी नियोजन आम्हाला समजण्याच्या पलीकडचे होते.)

३. गुरुदेवांच्या कृपेमुळे गाभार्‍यात जाता येऊन काशी विश्वनाथाचे दर्शन होणे

आम्ही महाआरती झाल्यावर गाभार्‍यात गेलो. शिवाला चरणस्पर्श करून भावपूर्ण दर्शन घेतले. तेथील पुजार्‍याने शिवलिंगावरील पुष्पहार आणि भस्म दिले अन् सांगितले ‘हा पुष्पहार आणि भस्म सेवाकेंद्रातील सर्व साधकांना द्या; कारण हा आशीर्वाद आहे.’ आम्ही संस्था आणि सर्व साधकांच्या वतीने हिंदु राष्ट्रासाठी अन् सर्व साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी काशी विश्वनाथाच्या चरणी भावपूर्ण प्रार्थना केली. नंतर माता अन्नपूर्णा आणि कालभैरव नाथ यांचे दर्शन घेतले. आम्ही कालभैरव नाथाच्या चरणी ‘आम्हा सर्व साधकांचे आणि समष्टीचे रक्षण करून आमची उन्नती होऊ दे’, अशी प्रार्थना केली अन् आश्रमात येतांना प्रथम श्री गुरुचरण पादुकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.’

– श्री. संदीप वाघ, मालेगाव. (१.४.२०१९)