रुग्णांना पलंगाखाली ठेवून उपचार !
अमरावती – शहरासह संपूर्ण जिल्ह्यात डेंग्यूसह साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया आणि थंडी, ताप यांची लाट आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांसाठी जागा नसल्याने अनेक रुग्णांना पलंगाच्या खाली झोपवून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. डेंग्यूमुळे जिल्ह्यात ९ जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात विदारक परिस्थिती !
जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्वच प्रभागांत रुग्णांची पुष्कळ गर्दी झाली असून डेंग्यू, मलेरिया आणि हिवताप असणार्या रुग्णांवर उपचार चालू आहेत. हे सर्व प्रभाग रुग्णांनी खच्चून भरले असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिस्थिती अतिशय विदारक आहे. डेंग्यू आणि मलेरिया संदर्भात रक्ताचे नमुने येण्यास विलंब होत असल्यामुळे रुग्णांना कोणता आजार आहे ?, हे कळण्यासही विलंब लागत आहे.
४० पलंगांची क्षमता असतांना ६६ बालके भरती !
लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणारे जिल्हा सामान्य रुग्णालय !
जिल्हा सामान्य रुग्णालयातील लहान मुलांसाठीचा प्रभाग क्रमांक ५ हाही पूर्णतः भरलेला आहे. तेथे ४० पलंगांची क्षमता असतांना ६६ बालके उपचारांसाठी भरती झाली आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील बालरोगतज्ञ डॉ. ऋषिकेश नागलकर म्हणाले की, परिस्थिती गंभीर आहे. आमच्या परीने आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनीही सावधानता पाळावी.