नेहरूंच्या विषयी पायल रोहतगी यांनी केलेल्या वक्त्यव्याचा व्हिडिओ प्रसारित केल्याचे प्रकरण
पुणे, ३ सप्टेंबर – ‘मला वाटते की, मोतीलाल नेहरू यांच्या ५ पत्नी होत्या; म्हणून काँग्रेस सरकार तिहेरी तलाकच्या विरोधात होते. यासमवेतच मोतीलाल नेहरू हे जवाहरलाल नेहरू यांचे सावत्र वडील होते’, असा दावा अभिनेत्री पायल रोहतगी यांनी एक व्हिडिओ ‘शेअर’ करत केला आहे. आपल्या या दाव्यात पायल रोहतगी यांनी एलिना रामाकृष्णाने लिहिलेल्या आत्मचरित्राचा उल्लेख केला होता. त्यामुळे काँग्रेस परिवाराची अपकीर्ती केल्याप्रकरणी पायल रोहतगी आणि व्हिडिओ सिद्ध करणार्या अज्ञात आरोपीविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याविषयी पुणे जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पायल रोहतगी यांच्या फेसबूक अकाऊंटवर पायल रोहतगी यांचे अधिवक्ता मनोज साबू यांनी सांगितले की, नेहरू-गांधी कुटुंबाविषयी सामाजिक प्रसारमाध्यमांवर कथित बदनामीकारक व्हिडिओ ‘पोस्ट’ केल्याबद्दल अभिनेत्री पायल रोहतगी यांच्या विरोधात पुण्यात नोंद करण्यात आलेल्या एफ्.आय.आर्. विषयी आम्हाला कोणतीही सूचना देण्यात आली नाही. हा व्हिडिओ जुना असून वर्ष २०१९ मध्ये ‘अपलोड’ केला होता. ज्यावर पूर्वीच राजस्थानमध्ये खटला प्रविष्ट करण्यात आला होता. त्यानंतर मागील १ वर्षापासून पायल रोहतगी यांचे सामाजिक प्रसारमाध्यमांतील ट्विटर, फेसबूक यांवरील खाते बंद आहेत. त्यानंतर त्यांनी कोणताही व्हिडिओ ‘अपलोड’ केला नाही.