परिवहन विभागातील पदोन्नतीसाठी लाखो रुपये घेतल्याचा गंभीर आरोप
मुंबई – परिवहन विभागातील पदोन्नतीसाठी लाखो रुपयांची वसुली केल्याच्या तक्रारीवरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांची लोकायुक्ताद्वारे चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्या विरोधात राज्यपालांकडे तक्रार केली होती. याविषयी २ सप्टेंबर या दिवशी सुनावणी होणार आहे.
किरीट सोमय्या म्हणाले, ‘‘मी ४ मासांपूर्वी राज्यपालांकडे तक्रार केली होती. उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी यांनी अनेक घोटाळे केले आहेत. त्यापैकी हा एक घोटाळा आहे. परिवहन विभागातील अधिकारी बजरंग खरमाटे हा अनिल परब यांचा सचिन वाझे आहे. त्याच्याद्वारे स्थानांतरासाठी २५ लाख ते सवा कोटी रुपयांपर्यंत पैसे वसूल करण्यात आले. त्यामुळे अंमलबजावणी संचालनालयाने खरमाटे यांच्या घरावर धाड टाकली. अनिल परब यांची संपत्तीही आपण पहात आहोत. हा पैसा कुठून आणला ? सचिन वाझे यांच्याकडून कि स्थानांतरामधून ? या घोटाळेबाजांना आता कारागृहाचे दरवाजे दिसत आहेत. प्रताप सरनाईक, अनिल परब, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, महापौर किशोरी पेडणेकर यांनी सगळ्यांनी सहस्रावधी कोटी रुपये लुटले आहेत. हा लुटीचा माल आम्ही सरकारच्या तिजोरीत परत आणत आहोत.’’