‘छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्थ रामदासस्वामी आणि दादोजी कोंडदेव यांनी खेळाचे शिक्षण दिले’, या संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचे प्रकरण
पुणे – ‘छत्रपती शिवाजी महाराज यांना खेळाचे शिक्षण समर्थ रामदासस्वामी आणि दादोजी कोंडदेव यांनी दिले’, असे वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण मंत्रालयाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’च्या कार्यक्रमात केले. त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून या वक्तव्याबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्र आणि शिवप्रेमी यांची क्षमा मागावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
‘छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासस्वामी यांची कधीही भेट झाली नाही. इतिहासामध्ये तसा कोणताही पुरावा नाही; मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व नाकारण्यासाठी समर्थ रामदासस्वामी आणि दादोजी कोंडदेव यांचा जाणीवपूर्वक उल्लेख केला जातो. (छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु समर्थ रामदासस्वामी आहेत, हे जगजाहीर आहे. समर्थांनी छत्रपतींना उपदेश केल्याचे दाखले आहेत. असे असूनही केवळ ब्राह्मणद्वेषापायी त्यांचे अस्तित्व नाकारणे हे निषेधार्ह आहे. समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी खोटा इतिहास प्रचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करणार्यांविरुद्ध प्रशासनाने कारवाई करणे अपेक्षित ! – संपादक) छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वकर्तृत्वावर इतिहास घडवला; मात्र काही तथाकथित इतिहासकारांनी खोटे आणि वादग्रस्त लेखन करून छत्रपती शिवाजी महाराज यांना अपकीर्त करण्याचा प्रयत्न केला. राजनाथ सिंह यांनी चुकीचा इतिहास मांडल्याने शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे संरक्षणमंत्र्यांनी महाराष्ट्राची क्षमा मागून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर नतमस्तक व्हावे’, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.