‘इस्लामिक स्टेट खुरासान’च्या कमांडरने दिली माहिती !
|
काबुल (अफगाणिस्तान) – अमेरिकेतील सी.एन्.एन्. या वृत्तसंस्थेने ‘इस्लामिक स्टेट खुरासान’ (‘खुरासान’ म्हणजे उत्तर पूर्व इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उजबेकिस्तान या देशांचा भूप्रदेश.) या आतंकवादी संघटनेच्या एका कमांडरची मुलाखत घेतली. त्यात त्याने ‘या संघटनेमध्ये भारतीय नागरिकांचाही (धर्मांधांचाही) समावेश आहे’, अशी माहिती दिली आहे. ‘काबुलमध्ये आमच्या संघटनेला कोणताच धोका नाही आणि आमची कुठल्याही प्रकारची चौकशी केली जात नाही’, असाही दावा या कमांडरने केला. काबुल विमानतळावर झालेल्या आत्मघाती बाँबस्फोटांच्या मागे १४ भारतियांचाही सहभाग असल्याचे यापूर्वीच समोर आले आहे. केरळमधून अनेक धर्मांध इस्लामिक स्टेटमध्ये भरती होण्यासाठी अफगाणिस्तान आणि सीरिया या देशांमध्ये गेले होते, हेही यापूर्वीच समोर आले आहे.
शरीयत लागू करणे, हाच आमचा मुख्य उद्देश !
नाव आणि ओळख उघड न करण्याच्या अटीवर या कमांडरने दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले की, शरीयत कायदा लागू करणे, हाच आमचा मुख्य उद्देश आहे. शरीयत कायदा लागू करण्यासाठी जे आमच्यासमवेत आहेत, ते आमचे भाऊच आहेत. जे विरोधात आहेत, त्यांच्या विरोधात युद्धाची घोषणा याआधीच आम्ही केलेली आहे. (हिंदू हे ‘काफीर’ असल्यामुळे ते जिहादी आतंकवाद्यांचे शत्रू आहेत’, हे लक्षात घ्या ! – संपादक)
आम्ही तालिबानशी हातमिळवणी केलेली नाही ! – इस्लामिक स्टेट खुरासान
हा कमांडर पुढे म्हणाला की, माझ्या नेतृत्वाखाली एकूण ६०० आतंकवादी काम करत आहेत. यांत अनेक पाकिस्तानी, भारतीय आदींचा समावेश आहे. काही ठिकाणी आम्ही तालिबानसमवेतही संघर्ष करत आहोत. आम्ही तालिबानसमवेत कोणतीच हातमिळवणी केलेली नाही. आम्ही तालिबानसमवेत काम करण्यास इच्छुक नाही. तालिबानवर अनेक विदेशी शक्तींचा प्रभाव आहे. तरीही तालिबानच्या सत्तेमुळे इस्लामिक स्टेटच्या वाढीला प्रोत्साहन मिळेल. पहिल्यापेक्षा आता वेगाने विस्तार करायला साहाय्य होईल आणि पुढील कारवाया आम्हाला चालू करता येतील.
आमचे अधिकार क्षेत्र केवळ अफगाणिस्तान पुरते मर्यादित !
‘आंतरराष्ट्रीय स्तरावर आक्रमण करणार का ?’ असे पत्रकाराने विचारले असता, ‘आमचे अधिकारक्षेत्र केवळ अफगाणिस्तान पुरते मर्यादित आहे. त्यामुळे मी तुम्हाला केवळ अफगाणिस्तान संदर्भातील माहिती देऊ शकतो’, अशी माहिती कमांडरने दिली.