कोल्हापूर – कोल्हापूर महापालिकेच्या ठेकेदारांच्या एका सामाजिक माध्यमाच्या गटात महापालिका विकासकामे ज्यांना मिळाली आहेत, त्यांनी कामे घेतांना जे ठरले आहे ते दोन दिवसांत जमा करावे, असा संदेश आला आहे. तरी या संदेशाविषयी महापालिका ठेकेदारांचे सखोल अन्वेषण करावे आणि दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे केली आहे. (विकासकामांच्या संदर्भातील असा देव-घेवीचा संदेश सामाजिक माध्यमात आल्यामुळे हे प्रकरण पुढे आले; अन्यथा अशी किती प्रकरणे होत असतील याचा विचारच न केलेला बरा ! तरी प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे ! – संपादक)
पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्वसामान्य करदात्याच्या घामाच्या पैशातून होणार्या या भ्रष्टाचारामुळे कुणाची घरे भरली जाणार कुणाच्या मालमत्ता वाढणार, हे जनतेला कळणे आवश्यक आहे. सुमारे १२ कोटी रुपयांचा निधी आणला, असा दावा होत असतांना त्याचे १८ टक्के म्हणजे सुमारे सव्वा कोटी रुपये, इतका पैसा ठेकेदारांकडून कोण काढून घेत आहे ? ते समजणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणात जे गुंतलेले असतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. या वेळी भाजपचे चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे, राजू मोरे, हेमंत आराध्ये, अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे पाटील, अजित सूर्यवंशी उपस्थित होते.