कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘निर्विचार’ हा नामजप ऐकण्याच्या प्रयोगात सहभागी झालेल्या साधकांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘निर्विचार’ हा नामजप ऐकण्याच्या प्रयोगात सहभागी झालेल्या साधकांना झालेले त्रास आणि आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

प्रयोगांद्वारे नामजपाचे महत्त्व मनावर बिंबवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले खऱ्या अर्थाने संशोधक !

१७ ते २३.६.२०२१ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांच्या आवाजात ‘निर्विचार’ हा नामजप ध्वनीमुद्रित करण्यात आला. त्यानंतर रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील तीव्र आध्यात्मिक त्रास असलेले साधक, आध्यात्मिक त्रास असलेले ६० टक्के अन् त्यांहून अधिक आध्यात्मिक पातळीचे साधक, आध्यात्मिक त्रास नसलेले साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेले ६० टक्के अन् त्यांहून अधिक आध्यात्मिक पातळीचे साधक, असे एकूण १८ साधक अन् संत यांना ७ दिवस प्रतिदिन १० मिनिटे हा ध्वनीमुद्रित केलेला नामजप ऐकवण्यात आला. त्या वेळी या प्रयोगात उपस्थित असलेल्या काही साधकांना झालेले त्रास आणि आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती पुढे दिल्या आहेत. पृष्ठ ७ वर साधक आणि संत यांच्यावर ‘निर्विचार’ नामजपाच्या होणार्‍या परिणामाचे विश्लेषण देण्यात आले आहे.

(भाग १)

‘निर्विचार’, ॐ निर्विचार किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप करण्याचे महत्त्व !

‘मन जोपर्यंत कार्यरत आहे, तोपर्यंत मनोलय होत नाही. मन निर्विचार करण्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन, भावजागृती इत्यादी कितीही प्रयत्न केले, तरी मन कार्यरत असते, तसेच एखाद्या देवतेचा नामजप अखंड केला, तरी मन कार्यरत असते आणि मनात देवाच्या आठवणी, भाव इत्यादी येतात. याउलट ‘निर्विचार’, ॐ निर्विचार किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप अखंड केला, तर मनाला दुसरे काहीच आठवत नाही. याचे कारण म्हणजे अध्यात्मातील ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, या नियमानुसार या नामजपामुळे मन त्या शब्दाशी एकरूप होऊन निर्विचार होते, म्हणजे प्रथम मनोलय, नंतर बुद्धीलय, त्यानंतर चित्तलय आणि शेवटी अहंलय होतो. त्यामुळे निर्गुण स्थितीत लवकर जाण्यास साहाय्य होते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

एक साधक

१. प्रयोगापूर्वी झालेला त्रास : ‘प्रयोगाचा परिणाम काय होणार आहे ?’, हे मला त्रास देणार्‍या वाईट शक्तीला आधीच कळले होते. त्यामुळे ‘तिने दुपारपासूनच माझ्याभोवती त्रासदायक आवरण निर्माण करून माझी मनःस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केला’, असे प्रयोगापूर्वी माझ्या लक्षात आले.

२. प्रयोगाच्या वेळी नामजप ऐकतांना झालेले त्रास

अ. ‘माझ्या उजव्या खांद्याच्या हाडाची झालेली झीज आणि मानेतील नस दबणे’, या कारणांमुळे प्रयोगाच्या ८ दिवस आधीपासून माझा उजवा हात पुष्कळ दुखत होता. नामजपाचा प्रयोग चालू झाल्यावर माझ्या डाव्या हाताचा खांदा आणि कोपर यांमध्ये माझ्या उजव्या हाताला होत असलेल्या वेदनांपेक्षा दुप्पट वेदना होऊ लागल्या. यावरून ‘माझ्या उजव्या खांद्यातील वेदना, म्हणजे वाईट शक्तीने माझ्या साधनेच्या प्रयत्नांत आणलेला अडथळा आहे’, असे माझ्या लक्षात आले.

आ. नामजप चालू असतांना मी डोळे मिटून बसलो होतो. तेव्हा ‘मी अंधार्‍या गुहेत बसलो आहे’, असे मला जाणवत होते.

३. प्रयोगानंतर झालेले त्रास

अ. माझ्यावर ‘निर्विचार’ या नामजपाचा पुष्कळ परिणाम होत होता. मला त्रास देणार्‍या वाईट शक्तीने तिची पूर्ण शक्ती नामजपाच्या विरोधात लावली. त्यानंतर ती वाईट शक्ती थकली. तेव्हा तिने माझी प्राणशक्ती खेचून घेतल्याने प्रयोग संपल्यावर माझ्यामध्ये चालण्याचेही त्राण उरले नव्हते.

आ. माझ्या दोन्ही हातांवर मोठ्या वाईट शक्तीने केलेल्या आक्रमणामुळे मला संगणकावर टंकलेखन करणे अशक्य झाले. प्रयोगापूर्वी मी डाव्या हाताने जी सेवा करत होतो, ती करण्यावरही बंधन आले.

४. प्रयोगानंतर झालेले सकारात्मक पालट

अ. प्रयोग संपल्यावरही माझा नामजप चालू होता आणि माझे मन शांत झाले होते. मला प्रत्येक प्रसंगाकडे सकारात्मक दृष्टीने बघता येत होते.

आ. प्रयोग संपल्यावर माझ्यात व्यष्टी साधना करण्याचा उत्साह निर्माण झाला आणि माझ्या मनाला हलकेपणा येऊन मला आनंद जाणवत होता.’

एक साधिका

१. ‘निर्विचार’ हा नामजप ऐकतांना माझ्या मनाला आनंद झाला. माझ्या मनातील विचार नष्ट होऊन ‘मी मोकळा श्वास घेत आहे’, असे मला जाणवले.

२. हा नामजप केल्यामुळे ‘मला माझ्या मनातील अहंच्या विचारांवर मात करता येत आहे’, असेही मी अनुभवले.’

२. आध्यात्मिक त्रास असलेल्या ६० टक्के अन् त्यांहून अधिक आध्यात्मिक पातळीच्या साधकांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

एक साधक (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के)

१७.६.२०२१ या दिवशी आलेल्या अनुभूती

अ. ‘निर्विचार’ या नामजपाच्या प्रयोगाच्या पहिल्या दिवशी नामजप चालू होण्यापूर्वी माझे पोट आणि डोके पुष्कळ दुखत होते. नामजप चालू झाल्यावर २ – ३ मिनिटांत माझे पोट आणि डोके यांतील वेदना पूर्ण थांबल्या.

आ. ‘माझ्या शरिराला आणि मनाला होत असलेल्या वेदना झपाट्याने नष्ट होत असून मी एका पोकळीत जात आहे’, असे मला जाणवत होते.

इ. माझे मन निर्विचार झाले. ‘नामजप करणे थांबवूच नये’, असे मला वाटले.

ई. काही कालावधीनंतर ‘मी कुठे आहे ?’, हेही मला कळत नव्हते. माझे मन पूर्णपणे शांत झाले.

१८.६.२०२१ या दिवशी आलेल्या अनुभूती

अ. प्रयोगाच्या दुसर्‍या दिवशी नामजप चालू होण्यापूर्वी मला माझ्या शरिरात पुष्कळ जडपणा जाणवत होता. माझे मन थोडे चंचल झाले होते. माझ्या मनातील सेवेविषयीचे विचार वाढले होते.

आ. ‘नामजप चालू झाल्यावर ५ मिनिटांत माझ्या भोवतालचे वाईट शक्तीचे आवरण दूर होऊन देह हलका झाला आहे’, असे मला जाणवले.

इ. एक क्षण ‘मी कुठे आहे ?’, हे मला कळलेच नाही. ‘माझ्या मनातील प्रत्येक विचार नामजपाने पुसला जात आहे आणि बाहेरून येणारे विचार बाहेरच्या बाहेर नष्ट होत आहेत अन् ते मनात प्रवेश करू शकत नाहीत’, असे मला जाणवले.

ई. माझे मन २ – ३ मिनिटांत एकाग्र झाले. मला पुष्कळ आनंद जाणवला आणि शांतही वाटत होते. माझी ही स्थिती अर्धा घंटा टिकून होती.

२१.६.२०२१ या दिवशी आलेल्या अनुभूती

अ. नामजप चालू होण्यापूर्वी माझ्या दोन्ही खांद्यांत वेदना होत होत्या. माझ्या शरिराला पुष्कळ कंड (खाज) येत होती. नामजप चालू झाल्यावर २ – ३ मिनिटांत माझ्या दोन्ही खांद्यांतील वेदना ४० टक्के न्यून झाल्या. माझ्या शरिराला येत असलेली कंड नाहीशी झाली. आ. माझ्या मनात माझ्या आईला होत असलेल्या त्रासांविषयी विचार येत होते; परंतु नामजप चालू झाल्यावर २ मिनिटांतच माझ्या मनातील विचार नष्ट झाले. माझे मन निर्विचार झाले. त्या वेळी मला पुष्कळ शांत वाटत होते.

आ. माझ्या शरिरात शीतल संवेदना निर्माण झाल्या होत्या. ‘नामजप संपूच नये’, असे मला वाटत होते. माझ्या मनातील आनंद आणि शांती यांचे प्रमाण पुष्कळ वाढले होते.’

एक साधिका (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)

१९.६.२०२१ या दिवशी आणि २१.६.२०२१ ते २३.६.२०२१ या कालावधीत आलेल्या अनुभूती

१. ‘निर्विचार’ हा नामजप ऐकतांना माझे मन शांत झाले आणि मला माझ्या डोळ्यांसमोर परात्पर गुरु डॉक्टरांचे रूप सतत दिसत होते.

२. नामजप ऐकतांना ‘देवाविना काही नको’, असे मला वाटत होते. ‘नामजपाचे चैतन्य हळूहळू माझ्या मनात जात आहे’, असे मला जाणवत होते.

३. ‘मनातील विचारांचे कवच माझ्या प्रत्येक अवयवाभोवती असून ते तुटत आहे’, असे मला वाटत होते. ‘विचारांच्या माध्यमातून वाईट शक्तीने माझ्या शरिरात भरलेली काळी शक्ती न्यून होत आहे’, असे जाणवून मला शांत वाटत होते. मला ‘पुष्कळ वेळ त्याच स्थितीत रहावे’, असे वाटत होते.

४. ‘माझ्या शरिरात पोकळी निर्माण होऊन माझ्या सहस्रारचक्रातून शरिरात चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवत होते.

५. या नामजपाच्या चैतन्याने माझा आध्यात्मिक त्रास न्यून होऊन माझ्यात उत्साह निर्माण झाला.’

– कु. तेजल पात्रीकर, संगीत विशारद, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय. (२१.८.२०२१)


लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/510337.html