वाहकांनी तिकीट वेंडिंग यंत्रणेत वारंवार दोष निर्माण होत असल्याच्या तक्रारी करूनही त्याकडे कानाडोळा करणार्या ‘एस्.टी.’ महामंडळाच्या संबंधित अधिकार्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे ! – संपादक
गोंदिया – येथे ‘एस्.टी’च्या तिकीट वेंडिंग यंत्रणेचा स्फोट होऊन झालेल्या अपघातात महिला वाहक कल्पना मेश्राम यांच्या हाताला दुखापत झाली आहे. या यंत्रणेच्या संदर्भात अनेक तक्रारी येत असतांना ही गंभीर घटना घडल्याने वाहक भयभीत झाले आहेत. या यंत्रणेमुळे वाहकासमवेत प्रवाशांच्याही जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी वेंडिंग यंत्रणेचे स्फोट झाले आहेत. ‘या यंत्रणेची ‘बॅटरी’ अधिक तापल्यामुळे हा स्फोट झाला आहे’, अशी शक्यता यंत्र सिद्ध करणार्या ‘ट्रायमॅक्स’ आस्थापनाचे अभियंता खोजेंद्र शिवहरे यांनी वर्तवली आहे. ‘एस्.टी’च्या वाहकांनी तिकीट वेंडिंग यंत्रणेतील ‘कीबोर्ड’ काम न करणे, तिकिटांची रक्कम यंत्रणेत दाखवणे; पण तिकीट चुकीचे छापून येणे, यंत्र वारंवार हँग होणे’, अशा स्वरूपाच्या तक्रारी प्रविष्ट केल्या होत्या, तरीही ‘एस्.टी.’ महामंडळाने त्यांची नोंद घेतलेली नाही.