१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण झाल्यावर ‘परमेश्वर, परमेश्वर’ असे लिहिले आणि बोलले जाणे अन् ‘सद्गुरु आणि संत यांना पुढचे लीलादर्शन करवणारा तो परमेश्वर’, हे लक्षात आल्यावर ‘असा परमेश्वर भेटला’, याबद्दल अत्यानंद होणे
‘साधारण दोन आठवड्यांपासून कुठेही स्वतःचे नाव लिहायचे असेल, तर माझ्याकडून ‘परमेश्वराची आरती’ असे लिहिले जाते. पूर्वी मी ‘परात्पर गुरुदेवांची आरती’ किंवा ‘भगवंताची आरती’ असे लिहीत असे, तसेच पूर्वी अनेकदा जप करत असतांना माझ्याकडून मधेच ‘परम पूज्य, परम पूज्य’ असा नामजप होत असे. आता मात्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण झाल्यावर किंवा त्यांचे नाव उच्चारल्यावर किंवा तसे लिहायला गेल्यावर ‘परमेश्वर, परमेश्वर’ असे लिहिले आणि बोलले जाते. हे सहजपणे होते. दोन दिवसांपूर्वी ‘परमेश्वर’ असे बोलले गेले आणि लक्षात आले, ‘साधकांच्या रूपात आश्रमात वावरणार्या देवता आहेत. साधकांना मार्गदर्शन करून भगवंताच्या लीलेविषयी सांगणारा ईश्वर म्हणजे सद्गुरु आणि संत. सद्गुरु आणि संत यांना पुढचे लीलादर्शन करवणारा तो परमेश्वर.’ हे लक्षात येताच ‘असा परमेश्वर मज भेटला’, याबद्दल मला अत्यानंद झाला आणि आनंदाने बागडावेसे वाटले.
२. ध्यानमंदिरात सद्गुरूंची ‘ज्योतसे ज्योत जगाओ…’ ही आरती म्हणत असतांना त्यातील ‘हे योगेश्वर, हे ज्ञानेश्वर, हे सर्वेश्वर, हे परमेश्वर…’ या ओळींच्या वेळी ‘बिंदूस्वरूप पांढर्या प्रकाशाच्या रूपात परमेश्वर (परात्पर गुरु डॉ. आठवले) दिसतो.’
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण करतांना ‘परमेश्वर’ असे उच्चारले जाऊन ते न दिसता त्यांच्या जागी फिकट पांढरा प्रकाश दिसतो.
४. साधनेत आल्यानंतर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे गुरु, श्रीकृष्ण आणि नारायणस्वरूप आहेत’, असे वाटून ते अनुभवणे
मी गेल्या १८ वर्षांपासून साधनेत आहे. तेव्हा प्रथम परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा आणि नंतर ‘परात्पर गुरु डॉक्टर हे श्रीकृष्णस्वरूप आहेत’, या भावाने त्यांचा ओढा वाटत असे. आता साधारण या ६ मासांत ‘परात्पर गुरु डॉक्टर हे ‘नारायणस्वरूप आहेत’, असे जाणवते, दिसते आणि अनुभवते.
५. नामजप करतांना श्रीकृष्णाच्या नामजपाऐवजी ‘ॐ नमो नारायणाय’ हा नामजप हृदयातून चालू होणे
साधारण १ आठवड्यापासून श्रीकृष्णाच्या नामजपाऐवजी ‘ॐ नमो नारायणाय’ असा नामजप हृदयात ध्वनीमुद्रित करून लावल्याप्रमाणे चालू होतो. इतर वेळीही असाच नामजप होतो. हा नामजप होत असतांना एक क्षण परात्पर गुरु डॉ. आठवले दिसून त्यांच्या जागी ‘फिकट पिवळसर प्रकाशाचा धबधबा दिसतो. ‘मी आत आत जाऊन त्यात विलीन होऊन जात आहे’, असे जाणवते. असे करत ‘जपाची वेळ कधी संपते ?’, हे कळत नाही. त्या वेळी मन निर्विचार आणि शांत होते.
६. ‘ॐ नमो नारायणाय’ हा नामजप चालू असतांना ‘ॐ’काराचा नामजप होणे आणि त्या वेळी ‘स्वतःचे अस्तित्वच नाही’, असे अनुभवता येणे
गेल्या ३ – ४ दिवसांपासून ‘ॐ नमो नारायणाय’ हा जप चालू असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जागी प्रकाशाचा धबधबा न दिसता प्रकाशाचा एक गोळा दिसतो आणि त्यात मी विलीन होतांना ‘ॐ’काराचा जप होत ‘स्वतःचे अस्तित्वच नाही’, अशी अनुभूती येते. ही अनुभती दोन ते अडीच मिनिटे टिकून रहाते. काही वेळाने परत ती प्रक्रिया होते. त्यानंतर हलके वाटते.’
– होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१०.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |