तक्रार केल्याप्रकरणी ६ प्राध्यापकांचे निलंबन !

  • १० खासगी महाविद्यालयांनी प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा मानसिक छळ केल्याचे प्रकरण

  • प्राध्यापकांचे विद्यापिठासमोर आंदोलन

    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

नागपूर – ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाशी संलग्नित १० नामवंत खासगी महाविद्यालयांकडून प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा प्रचंड मानसिक छळ केला जात आहे’, अशी धक्कादायक माहिती विद्यापिठाच्या ‘विशेष अन्वेषण समिती’ने सादर केलेल्या अहवालातून उघड झाली होती. त्यानंतर विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांनी अशा महाविद्यालयांवर कुठलीही कारवाई केली नाही. परिणामी या १० महाविद्यालयांचा उद्दामपणा कायम असून चौकशी समितीसमोर तक्रार केल्याच्या कारणावरून प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील ६ प्राध्यापकांना निलंबित केले आहे.

या विरोधात ‘नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन’चे (‘नुटा’चे) उपाध्यक्ष आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन कोंगरे यांच्या नेतृत्वाखाली विद्यापिठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोर महाविद्यालयांच्या प्राध्यापकांनी आंदोलन केले. विद्यापिठाद्वारे गठीत ‘विशेष अन्वेषण समिती’ कर्मचार्‍यांच्या तक्रारी असणार्‍या अनेक महाविद्यालयांना भेटी देऊन पडताळणी करत आहे. ‘अन्वेषण चालू असतांना कुठल्याही महाविद्यालयांना तक्रारकर्त्या कर्मचार्‍यांवर दबाव किंवा कारवाई करता येणार नाही’, असे समितीच्या अहवालात नमूद केले आहे.

समितीने १० महाविद्यालयांकडून कर्मचार्‍यांवर झालेल्या अन्यायाचा अहवालही कुलगुरु डॉ. चौधरी यांना सादर केला आहे. ‘१० महाविद्यालयांनी कर्मचार्‍यांचा आर्थिक आणि मानसिक छळ केला असून अनेकांना वेतनही दिले नाही’, असे अहवालात म्हटले आहे. असे  असतांनाही कुलगुरूंकडून या महाविद्यालयांवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. ‘कुलगुरूंकडून या महाविद्यालयांवर वेळेत कारवाई न झाल्याने त्यांची मुजोरी वाढली आहे’, असा आरोप आंदोलक प्राध्यापकांनी केला.

‘‘खासगी महाविद्यालयांकडून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर होत असलेल्या अन्यायावर कुलगुरूंना अहवाल सादर केला आहे. त्यानंतरही अद्याप कारवाई झाली नाही. या शिक्षकांना वेळेत न्याय न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.’’ – डॉ. नितीन कोंगरे, उपाध्यक्ष, नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन