आसगाववासियांच्या मोर्च्यानंतर स्थानिक पंचायतीने श्री दत्तात्रेय देवस्थानच्या झर्‍याजवळील बांधकाम बंद ठेवण्याचा दिला आदेश !

म्हापसा, २४ ऑगस्ट (वार्ता.) – आसगाव येथील श्री दत्तात्रेय देवस्थानच्या झर्‍याच्या शेजारी एका बांधकाम प्रकल्पाचे काम चालू आहे. हे नैसर्गिक झर्‍याचे पाणी मंदिरात श्रींच्या पूजनासाठी वापरले जाते. या प्रकल्पामुळे देवस्थानच्या झर्‍यावर परिणाम होणार असल्याने याला ग्रामस्थ गेल्या काही दिवसांपासून विरोध करत आहेत. या प्रकरणी आसगाववासियांनी २४ ऑगस्ट या दिवशी स्थानिक पंचायतीवर मोर्चा काढला. या प्रकरणी पंचायतीचे सरपंच आणि पंचायत मंडळ यांनी ग्रामस्थांची फसवणूक केल्याचा आरोप करून ग्रामस्थांनी सरपंच हनुमंत नाईक यांनी पदाचे त्यागपत्र देण्याची मागणी केली. ग्रामस्थांनी मोर्चा काढल्यानंतर आसगाव पंचायतीने श्री दत्तात्रेय मंदिराच्या नैसर्गिक आणि वारसा झर्‍याजवळील बांधकाम बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. ग्रामपंचायतीने २४ ऑगस्ट या दिवशी पंचायत मंडळाची एक विशेष बैठक बोलावून हा आदेश दिला.