१. आईला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभणे आणि तेव्हापासून ती सतत त्यांच्या अनुसंधानात असणे
‘काही वर्षांपूर्वी मी आईला घेऊन रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेलो होतो. त्या वेळी माझ्या आईला (श्रीमती भागीरथी सखाराम कुंभार यांना) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. तेव्हा परात्पर गुरुदेवांनी अन्य साधकांना ‘आईकडे पाहून काय वाटते ?’, असे विचारले होते. त्यानंतर परात्पर गुरुदेवांनी आईचे छायाचित्र काढायला सांगितले होते. तेव्हापासून आई सतत परात्पर गुरुदेवांच्या अनुसंधानात असते.
२. परात्पर गुरुदेवांनी ‘सासूबाईंची सेवा संतसेवा समजून करा, त्यातून तुमची साधना होईल’, असे साधकाच्या पत्नीला सांगणे
त्यानंतर आम्हा उभयतांनाही परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग लाभला. त्या वेळी पत्नीने (सौ. राजश्रीने) परात्पर गुरुदेवांना सांगितले, ‘‘आम्ही काही दिवस मुलाच्या लग्नासाठी आणि आईंच्या (सासूबाईंच्या) सेवेसाठी घरी थांबणार आहोत.’’ तेव्हा परात्पर गुरुदेव म्हणाले, ‘‘सासूबाईंची सेवा संतसेवा म्हणून करा. त्यातून तुमची साधना होईल.’’
३. सद्गुरु सत्यवान कदम यांनी आईची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करणे
१४.२.२०२० या दिवशी सद्गुरु सत्यवान कदम आणि काही साधक तेंडोली (तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग) येथे आमच्या घरी आले. त्या वेळी सद्गुरु सत्यवान कदम यांनी माझ्या आईची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित केले.
४. आईचे बोलणे आणि खाणे अकस्मात् बंद होणे अन् औषधोपचारानंतर तिला थोडे बरे वाटणे
जून २०२१ मध्ये आईच्या आजारपणात वाढ झाली. तिचे बोलणे आणि खाणे अकस्मात् बंद झाले. आम्ही लगेच तिच्यावर कुडाळ येथील वैद्य सुविनय दामले यांच्याकडील उपचार चालू केले. औषधोपचारानंतर तिला थोडे बरे वाटू लागले. ती बोलू लागली आणि जेवण करू लागली.
५. आईमध्ये जाणवलेले पालट
२९.६.२०२१ या दिवशी आम्ही (मी आणि माझी पत्नी सौ. राजश्री) रामनाथी आश्रमातून आईला भेटण्यासाठी घरी गेलो. तेव्हा आम्हा उभयतांना ‘आईमध्ये पुष्कळ पालट झाले आहेत’, असे लक्षात आले.
५ अ. नामजप चालू असणे : मी आईला विचारले, ‘‘तू नामजप करतेस ना ?’’ तेव्हा तिने मान हालवून होकार दिला. मी तिला विचारले, ‘‘कोणता नामजप करतेस ?’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘नमो.’’ ‘नमो’ म्हणजे ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ आई हा नामजप पूर्वीपासून करते.
५ आ. ‘आई सतत देवाच्या अनुसंधानात असते’, असे आम्हाला जाणवले.
५ इ. आईला आरतीच्या वेळी देवघरात यायचे असते. त्या वेळी तिला आसंदीत बसवून उचलून आणायला कुणी नसेल, तर ती भूमीवर बसून सरकत सरकत देवासमोर येते.
५ ई. आई आसंदीवर ३ – ४ घंटे बसते. ‘त्या वेळी ती टाळ्या वाजवल्याप्रमाणे हातांची हालचाल करून भजन करत असते’, असे आम्हाला जाणवले.
५ उ. स्वतः आजारी असूनही मुलगा आणि सून यांना आश्रमात जायला अनुमती देणे : १५.७.२०२१ या दिवशी आम्ही रामनाथी आश्रमात जाण्यासाठी निघतांना आईला सांगितले, ‘‘आम्ही आश्रमात जात आहोत.’’ तेव्हा ती आजारी असतांनाही तिने आम्हाला थांबवले नाही. तिने मान हालवून आम्हाला जाण्याची अनुमती दिली.
६. आईच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
६ अ. आईच्या हाताचा स्पर्श लोण्यासारखा मऊ लागणे : आईने माझ्या डोक्यावरून आणि गालावरून हात फिरवल्यावर तिचे हात लोण्यासारखे मऊ लागतात. आईने ‘माझ्या डोक्यावरून असाच हात फिरवत रहावा’, असे मला वाटते.
६ आ. ‘आईच्या हातांतून चांगली स्पंदने प्रक्षेपित होत आहेत’, असे मला जाणवले.’
– श्री. रामचंद्र कुंभार (मुलगा, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.७.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |