यंदा गोव्यात सार्वजनिक गणेशात्सव मंडळांचा सांस्कृतिक कार्यक्रम टाळून केवळ धार्मिक विधी करण्यावर भर

सार्वजनिक गणेशोत्सव

पणजी, २३ ऑगस्ट (वार्ता.) – गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात कोरोनाच्या संसर्गाचा धोका कायम असल्याने राज्यातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सवांनी सांस्कृतिक कार्यक्रम टाळून केवळ धार्मिक विधींवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी दीड दिवसांचा, तर उर्वरित मंडळांनी ११ दिवसांचा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेशोत्सवाविषयी अधिक माहिती देतांना पणजी येथील ‘पणजीकर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अशोक पाटील म्हणाले, ‘‘यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव कोरोनाविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करून दीड दिवस साजरा केला जाणार आहे. धार्मिक विधी केले जातील आणि सांस्कृतिक कार्यक्रम नसतील.’’

म्हापसा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष तुषार टोपले म्हणाले, ‘‘यंदा अनंत चतुर्दशीपर्यंत म्हणजे १० दिवस उत्सव साजरा करणार; मात्र या काळात सांस्कृतिक कार्यक्रम नसणार, तर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून धार्मिक विधी केले जाणार आहेत.’’

सर्वच गणेशोत्सव मंडळांचा अशा स्वरूपाचा निर्णय आहे; मात्र शासनाने गणेशोत्सवाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केलेली नाहीत.