सनातनची छत्री उघडून झोपल्याने आध्यात्मिक त्रासाची तीव्रता उणावून शांत झोप लागणे

सौ. जयश्री पाटील

१. झोपल्यावर ‘कुणीतरी स्वत:च्या दिशेने येत आहे’, असे जाणवणे, आध्यात्मिक त्रासामुळे पुष्कळ प्रयत्न करूनही शरिराची हालचाल करता न येणे आणि शांत झोप न लागणे

‘बर्‍याचदा मला झोपल्यावर आध्यात्मिक त्रास होतात. ‘झोपलेले असतांना कुणीतरी माझ्या दिशेने येत आहे’, असे मला जाणवते. त्या वेळी मी अर्धवट जागी असते; पण माझे संपूर्ण शरीर मात्र बधीर झालेले असते. त्या वेळी उठण्याचा पुष्कळ प्रयत्न करूनही मी डोळ्यांची पापणीही हालवू शकत नाही. विजेचा धक्का (करंट) लागावा, तसे माझे संपूर्ण शरीर थरथरत असते. उठण्याचा आटोकाट प्रयत्न करूनही स्थूल देह जराही हलू शकत नाही; मात्र कधी कधी पुष्कळ प्रयत्न केल्यास एक देह झोपलेला आणि दुसरा देह प्रयत्नपूर्वक कमरेपर्यंत उठून बसलेला दिसतो. आतून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आळवणे चालू झाल्यावर मला झोप लागते आणि थोड्या वेळाने पुन्हा जाग येते.

२. झोपण्यापूर्वी सनातनची छत्री उघडून उशीजवळ ठेवल्यावर छत्रीमुळे देहाभोवती संरक्षककवच निर्माण झाल्याचे जाणवणे आणि आध्यात्मिक त्रासाची तीव्रता अत्यल्प होऊन काही क्षणांतच झोप लागणे

दोन-तीन मासांपूर्वी पलंगाच्या खाली ठेवलेली सनातनची छत्री पाहिल्यावर ‘छत्री रात्री झोपण्यापूर्वी उशाला उघडून ठेवूया’, असा विचार माझ्या मनात आला. त्याप्रमाणे देवाने कृतीसुद्धा करवून घेतली आणि त्याच रात्री ‘पुन्हा ती अनिष्ट शक्ती मला त्रास देण्यासाठी येत आहे’, असे मला जाणवले. ती जवळ येताच माझे शरिर बधिर होऊ लागले; पण ‘मी आज सनातनची छत्री उघडून झोपले आहे’, हे लक्षात येऊन माझे मन स्थिर झाले. तेव्हा त्या छत्रीच्या उघडून ठेवलेल्या गोलातून पिवळे किरण बाहेर पडून माझ्या देहाभोवती संरक्षककवच निर्माण झाल्याचे मला दिसले आणि त्यामुळे मला होणार्‍या त्रासाची तीव्रता अत्यल्प झाली. काही क्षणांतच मला झोप लागली. ‘सनातनची उत्पादने केवळ उत्पादने नसून ती साधकांना चैतन्य पुरवणारी आणि रक्षणासाठी आहेत’, याची पुन्हा एकदा प्रचीती आली. या चैतन्यमय उत्पादनांसाठी गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. जयश्री पाटील, जळगाव (१८.६.२०१९)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक