सिंधुदुर्ग – गतवर्षीच्या अनुभवावरून आगामी गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यात येणार्यांसाठी कडक निर्बंध लादले घातले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गतवर्षी जिल्ह्यात प्रशासनाने कडक निर्बंध लादले होते. त्यामुळे जिल्ह्यात येणार्या गणेशभक्तांचे प्रमाण उणावले होते; मात्र गणेशोत्सवानंतर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. सध्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव अल्प असला, तरी प्रशासन कोणताही धोका पत्करण्यास सिद्ध नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आतापासूनच जिल्ह्यात येणार्या मार्गांवर आणि रेल्वेस्थानकांवर गणेशभक्तांची तपासणी करण्याची व्यवस्था केली जात आहे, तसेच कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन मात्रा (डोस) घेतलेल्यांनाही निर्बंधात सूट मिळण्याची शक्यता अल्प आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणार्यांना लसीच्या दोन मात्रा घेतलेल्या असल्या, तरी कोरोनाची तपासणी करणे बंधनकारक करण्याचे संकेत दिले आहेत. लवकरच याविषयी आढावा घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.