गोव्यातील ५ ते १७ वर्षे वयोगटातील ६६.६ टक्के मुलांमध्ये ‘कोरोना ॲन्टीबॉडीज’ आढळल्या ! – ‘पीडियाट्रिक सिरो सर्व्हे’चा अहवाल

पणजी – गोव्यातील ५ ते १७ वर्षे वयोगटातील ६६.६ टक्के मुलांमध्ये ‘कोरोना ॲन्टीबॉडीज’ आढळल्या आहेत. आरोग्य खात्याच्या ‘इंटीग्रेटेड डिसीझीस सर्व्हेलन्स’ कार्यक्रमांतर्गत ‘पीडियाट्रिक सिरो’ सर्वेक्षणात हे आढळून आले. या सर्वेक्षणात ४८० मुलांवर हा प्रयोग करण्यात आला.

६६.६ टक्के मुलांमध्ये ‘कोरोना ॲन्टीबॉडीज’ आढळल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेला आहे, हे स्पष्ट होते. पालकांनीही कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्या आहेत. यामुळे १७ सप्टेंबर या दिवशी कोरोना व्यवस्थापनाच्या सुकाणू समितीच्या होणार असलेल्या बैठकीत १ ऑक्टोबरपासून शाळा चालू करण्याविषयीचा निर्णय होऊ शकतो, अशी माहिती डॉ. शेखर साळकर यांनी दिली. डॉ. शेखर साळकर हे शासनाने नियुक्त केलेल्या तज्ञ समितीचे एक सदस्य आहेत.

ते पुढे म्हणाले, ‘‘पीडियाट्रिक सिरो’ सर्वेक्षणात बेतकी, काणकोण आणि सांगे या ठिकाणी मुलांमध्ये ‘कोरोना ॲन्टीबॉडीज’ ३० ते ३५ टक्के आढळल्या आहेत; मात्र इतर ठिकाणच्या मुलांमध्ये ‘कोरोना ॲन्टीबॉडीज’ अधिक प्रमाणात आहेत. यामुळे ज्या भागांतील मुलांमध्ये ‘कोरोना ॲन्टीबॉडीज’ अधिक प्रमाणात आहेत, त्या ठिकाणी प्रथम शाळांचे प्रत्यक्ष वर्ग प्रायोगिक तत्त्वावर चालू करता येतील, तसेच शाळा ‘ऑनलाईन’ आणि शाळेचे  प्रत्यक्ष वर्गही भरवायचे अन् विद्यार्थ्यांना कोणता वर्ग पाहिजे याचा निर्णय पालकांवर सोडायचा. यामुळे शाळांमध्ये मुलांची संख्या घटेल आणि सामाजिक अंतर पाळणे आदी नियमांचे पालन करणे सुलभ होईल. प्रायोगिक तत्त्वावर असे वर्ग चालू केल्यानंतर पुढील निर्णय घेता येईल.