सातारा, २० ऑगस्ट (वार्ता.) – कोरोनाचा वाढता संसर्ग थांबवण्यासाठी रेल्वे विभागाच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने लांब पल्ल्याच्या गाड्या चालू करण्यात आल्या आहेत. या सर्व गाड्या जलद (एक्सप्रेस) आहेत; मात्र याचे दर सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारे आहेत. त्यामुळे नियमित प्रवास करणार्या प्रवाशांसाठी सातारा-कोल्हापूर पॅसेंजर गाडी चालू करावी, अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
सातारा-कोल्हापूर, कोल्हापूर-पुणे आणि मिरज-बेळगाव या तिन्ही पॅसेंजर गाड्यांतून प्रवासी नियमितपणे मोठ्या संख्येने प्रवास करतात; मात्र सध्या या गाड्या बंद असल्यामुळे कामगार वर्गास आर्थिक भार सोसावा लागत आहे. सध्या मिरज येथून कोल्हापूरला जाण्यासाठी ६० रुपये मोजावे लागत आहेत. हेच पॅसेंजर चालू झाली, तर १५ रुपये देऊन प्रवासी कोल्हापूरला जाऊ शकतो. त्यामुळे एका प्रवाशाचे ४५ रुपये वाचणार आहेत, तसेच मुंबईमध्ये लोकल प्रवास चालू झाला आहे, तर मग योग्य नियमांना अधिन राहून पॅसेंजर चालू करण्यास काय हरकत आहे ? असा प्रश्न प्रवासी उपस्थित करत आहेत.
आदेश मिळताच पॅसेंजर गाड्या चालू करणार ! – मनोज झंवर, रेल्वे जनसंपर्क अधिकारी
याविषयी रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रकारची काळजी घेत जलद (एक्सप्रेस) गाड्या चालू करण्यात आल्या आहेत. पॅसेंजर गाड्यांविषयी अद्याप कोणताही निर्णय आला नसल्यामुळे त्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. संबंधित गाड्या चालू करण्याचे आदेश मिळताच त्या चालू करण्यात येतील.