आतंकवाद अधिक काळ मानवतेला संपवू शकत नाही, याचे सोमनाथ मंदिर हे प्रतीक ! – पंतप्रधान मोदी

सोमनाथ मंदिराच्या नूतनीकरणाचे पंतप्रधान मोदी यांच्याकडून ऑनलाईन उद्घाटन

कणार्वती (गुजरात) – श्रद्धेला दहशतीने संपवता येत नाही. सोमनाथ मंदिर आमच्या विश्‍वासाचे प्रेरणास्थळ आहे. सोमनाथ मंदिराचे अस्तित्व मिटवण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले. जेवढ्या वेळा ते पाडण्यात आले, तेवढ्या वेळा ते पुन्हा बांधण्यात आले. आतंकवाद अधिक काळ मानवतेला संपवू शकत नाही. तसेच त्याचे अस्तित्व कायमचे असू शकत नाही, हे सोमनाथ मंदिराच्या इतिहासातून लक्षात येते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते गुजरातच्या किनार्‍यावर असलेल्या १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असणार्‍या सोमनाथ मंदिराच्या नूतनीकरणाच्या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित राहून बोलत होते. ‘जग आजही आतंकवादी विचारांनी त्रस्त आहे, तर सोमनाथ मंदिर हे समृद्ध भारताचे प्रतीक आहे’, असेही मोदी म्हणाले. या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हेही उपस्थित होते.

मोदी पुढे म्हणाले की, मी लोकमाता अहिल्याबाई होळकर यांना प्रणाम करतो. त्यांनी काशी विश्‍वनाथ ते सोमनाथपर्यंत कित्येक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. सोमनाथ युगानुयुगे सदाशिवाची भूमी राहिली आहे. हिंदु धर्मशास्त्रात म्हटले आहे की, जो कल्याण करतो, तो शिव. यामुळे शिव आमच्या श्रद्धेच्याही पलिकडे आहे. सोमनाथ मंदिर असे स्थान आहे ज्याला सहस्रो वर्षांपर्यंत आपल्या ऋषींनी ‘ज्ञान क्षेत्र’ असल्याचे सांगितले होते. आज हे मंदिर संपूर्ण जगाला आव्हान देत ‘असत्याने सत्याला पराजित करता येणे शक्य नाही’, याचा संदेश देते.

मंदिर परिसरात ७१ फुटी पार्वती मंदिर बांधण्यात येणार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ मंदिराच्या नूतनीकरणामध्ये मंदिर परिसरात वेगवेगळ्या योजनांचा प्रारंभ केला. सोमनाथ समुद्र दर्शन पदपथ, प्रदर्शन केंद्र आणि नूतन अहिल्याबाई होळकर मंदिर यांचे पंतप्रधान मोदी यांनी ऑनलाईन उद्घाटन केले. तसेच पार्वती मंदिराची कोनशिला ठेवण्यात आली. पार्वती मंदिर पांढर्‍या दगडांमध्ये बांधले जाणार आहे. याची उंची ७१ फूट असेल. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे सोमनाथ मंदिराचे विश्‍वस्त आहेत.