चिमूर (जिल्हा चंद्रपूर) – शहरातून विनाअनुमती वाहनफेरी काढून पोलीस विभागाच्या दिशा निर्देशांचे पालन न केल्याने भाजपचे आमदार कीर्तीकुमार भांगडियांसह त्यांच्या ८ कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
१६ ऑगस्ट या दिवशी चिमूर येथे ‘क्रांती शहीद स्मृती दिना’निमित्त हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी राज्याचे साहाय्य आणि पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा नियोजित शासकीय दौरा होता. विजय वडेट्टीवार मनोगत व्यक्त करत असतांना आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली वाहन फेरी स्मारकापुढे आली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुढे न जाता मोठ्याने घोषणा दिल्या. काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना फेरी नेण्यास सांगितले. यामुळे भाजप कार्यकर्तेही संतप्त झाले. त्यानंतर दोघांमध्ये धक्काबुक्की झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांना एकमेकांपासून दूर नेले.