‘तिल्लाना’ या नृत्यप्रकाराचे आध्यात्मिक महत्त्व

ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग

तिल्लाना

‘तिल्लाना’ म्हणजे हिंदुस्थानी संगीत पद्धतीतील ‘तराना’ होय. हे एक शुद्ध नृत्य आहे. हे गतीमान असते. यात भावापेक्षा संगीताला महत्त्व असते.

‘तिल्लाना’ नृत्यप्रकार सादर करतांना ५९ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर

१. तिल्लाना नृत्यप्रकार

‘तिल्लाना’ हा नृत्यप्रकार कर्नाटकी संगीताच्या अंतर्गत असून संगीत किंवा नृत्य यांची सांगता शक्यतो ‘तिल्लाना’ प्रकाराने केली जाते.

२. भरतनाट्यम् नृत्याच्या अंतर्गत ‘तिल्लाना’ हा नृत्यप्रकार सादर केल्यामुळे होणारी सूक्ष्म स्तरावरील प्रक्रिया

भरतनाट्यम्मध्ये ‘तिल्लाना’ हा प्रकार वैशिष्ट्यपूर्ण आहे. या प्रकारातील गायनातून निर्गुण स्तरावरील चैतन्य अधिक प्रमाणात प्रक्षेपित होऊन त्याचा परिणाम अनाहतचक्र, विशुद्धचक्र आणि आज्ञाचक्र यांवर होतो. ‘तिल्लाना’ संगीतप्रकार ऐकतांना प्रथम भाव जागृत होतो. जेव्हा भावऊर्जा अनाहतचक्रातून वरच्या दिशेने प्रवाहित होते, तेव्हा अंतर्मुखता वाढते. जेव्हा ही भावऊर्जा आज्ञाचक्राच्या ठिकाणी पोचते, तेव्हा जागृत अवस्था लोप पावून ध्यानावस्था चालू होते. हा भावऊर्जेचा परम बिंदू आहे.

कु. मधुरा भोसले

३. विविध रागांमध्ये ‘तिल्लाना’ हा प्रकार सादर केल्यामुळे होणारे सूक्ष्म परिणाम

३ अ. जोग आणि मालकंस या रागांत ‘तिल्लाना’ हा संगीत प्रकार गायल्यामुळे होणारा सूक्ष्म स्तरावरील परिणाम : जोग आणि मालकंस या रागांमध्ये ‘तिल्लाना’ हा संगीत प्रकार गायल्यामुळे श्रोत्यांची अंतर्मुखता वाढून त्यांच्या हृदयात देवाप्रतीचा आर्तभाव जागृत होतो.

३ आ. दरबारी कानडा या रागात तिल्लाना गायल्यामुळे होणारा सूक्ष्म स्तरावरील परिणाम : दरबारी कानडा या रागामध्ये ‘तिल्लाना’ हा संगीत प्रकार गायल्यामुळे भावजागृतीसह ध्यान लागण्याची प्रक्रिया शीघ्र गतीने होते. या रागाची सात्त्विक ऊर्जा स्वाधिष्ठानचक्रातून आरंभ होऊन आज्ञाचक्राच्या (वरच्या) दिशेने प्रक्षेपित होतांना पोटापासून कपाळापर्यंत थंडावा जाणवतो. त्यामुळे सूर्यनाडी बंद होऊन सुषुम्ना नाडी चालू होते.

३ इ. राग धनश्री, बागेश्री, यमन कल्याण आणि देस या रागांमध्ये ‘तिल्लाना’ गायल्यामुळे होणारा परिणाम : राग धनश्री, राग बागेश्री, राग यमन कल्याण आणि राग देस हे राग उत्तर भारतीय संगीतातील असून त्यात तिल्लाना गायल्याने अधिक उत्साह जाणवून कार्याला गती लाभते.

३ ई. कथ्थक नृत्यातील ‘तराना’ आणि भरतनाट्यम् नृत्यातील ‘तिल्लाना’ यांमध्ये साम्य असणे : कथ्थक नृत्यातील ‘तराना’ आणि भरतनाट्यम् नृत्यातील ‘तिल्लाना’ यांत काही प्रमाणात साम्य जाणवते. दोन्ही प्रकारांमध्ये विशिष्ट बोल विविध लयीत म्हटले जातात. दोन्ही प्रकार पुष्कळ सात्त्विक असून या प्रकाराचे संगीत ऐकल्याने किंवा नृत्य पाहिल्याने सात्त्विकता आणि अंतर्मुखता वाढण्यास साहाय्य मिळते.’

– कु. मधुरा भोसले (६३ टक्के आध्यात्मिक पातळी) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.२.२०२१)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.