‘देव प्रत्येक इच्छा कशी पूर्ण करतो’, याची साधकाला आलेली अनुभूती

सेवा करतांना सीताफळे विकत घेण्याचा विचार मनात येऊनही ती न घेतल्याने देवाने एका अनोळखी मुलाच्या माध्यमातून सीताफळे पाठवून ‘देव प्रत्येक इच्छा कशी पूर्ण करतो’, याची साधकाला दिलेली अनुभूती

श्री. प्रशांत चव्हाण

१. प्रदर्शनस्थळी सेवा करतांना सीताफळे विकत घेण्याचा विचार पुनःपुन्हा मनात येणे

‘एकदा आम्ही शहादा, जळगाव येथील बाजारात धर्मरथावर ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावले होते. त्या वेळी बाजारात ठेवलेली सीताफळे पाहून ती विकत घेण्याचा विचार माझ्या मनात आला. ‘सीताफळे नंतर घेऊ’, असा विचार करून मी तिकडे गेलो नाही. नंतर सीताफळे घेण्याचा विचार पुन्हा येऊनही प्रदर्शनस्थळी सेवा असल्याने मला जाता आले नाही. दिवसभरात माझ्या मनात सीताफळे घेण्याविषयी ३ वेळा विचार आले.

२. रात्री प्रदर्शनस्थळी अनोळखी मुलाने दोन किलो सीताफळे आणून देणे

रात्री प्रदर्शनस्थळी आवराआवर करतांना एक मुलगा आला. आमची ओळख नसतांनाही त्याने मला ‘तुमच्यासाठी दोन किलो सीताफळे आणली आहेत’, असे सांगितले. मी त्याला विचारले, ‘‘तुला कुणी पाठवले ?’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘मी दिवसभर ४० रुपये किलो या भावाने सीताफळे विकली. ही तुम्ही घ्या.’’ त्याचे बोलणे ऐकून ‘देवानेच त्याला पाठवले आहे’, असे मला जाणवले. या प्रसंगातून ‘देव आपल्यासाठी किती करतो ! आपण संपूर्ण समर्पणभावाने सेवा करायला हवी’, हे मला शिकायला मिळाले.

‘आपल्याला जे आवश्यक आहे, ते देव त्या वेळी देतच असतो; म्हणून आपण अन्य विचारांमध्ये वेळ वाया न घालवता देवाच्या अनुसंधानात राहिले पाहिजे’, हे माझ्या लक्षात आले. मी देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. प्रशांत चव्हाण, सातारा (१३.१२.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक