पुणे, १५ ऑगस्ट – बनावट आस्थापनात वाहने भाडेतत्त्वावर घेण्याचे आमीष देऊन ९ वाहनांची करारपत्रे बनवली, तसेच २ कोटी ४० लाख रुपयांची २८ वाहने भाड्याने घेत १५ लाख रुपयांचे भाडे न देता २ कोटी ५५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना लोणी काळभोर येथे घडली आहे. या प्रकरणी अविनाश कदम यांनी तक्रार केल्यानंतर मलिकबाबा शहा उपाख्य मुजाहिद सय्यद गिलानी आणि ओंकार वटाने या दोघांवर गुन्हा नोंद केला आहे. कदम यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. मलिकबाबा यांच्या आस्थापनाला गाड्यांची आवश्यकता असून गाडी आस्थापनास लावण्यास प्रतिमास २५ सहस्र मिळतील, असे त्यांनी कदम यांना सांगितले होते.