पुण्यातील गणेशोत्सव साधेपणाने करण्यावर गणेशोत्सव मंडळांचे एकमत !

वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचे धर्मशास्त्र असतांनाही त्याकडे कानाडोळा करून विसर्जन हौदामध्ये मूर्ती विसर्जित करण्याचा महापालिकेकडून प्रयत्न होतो; मात्र हौदामध्ये विसर्जित झालेल्या मूर्तींचे पुढे काय होते ? हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. – संपादक 

पुणे – कोरोनाच्या संसर्गामुळे या वर्षीही गणेशोत्सव साधेपणाने, मिरवणुकाविरहित आणि ‘ऑनलाईन’ दर्शनावर भर देत सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यावर गणेशोत्सव मंडळांचे एकमत झाले आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वसिद्धतेसाठी महापालिकेने गणेश मंडळांसमवेत बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ, आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त, उपमहापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, माजी नगरसेवक यांच्यासह विविध गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेकडून शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणार्‍या शाळा, मैदाने आणि मोकळ्या जागा येथे पाण्याचे हौद बांधण्यात येणार असून फिरत्या हौदांची संख्या वाढवणार आहे, असे महापौर मोहोळ यांनी सांगितले. गणेशोत्सव मंडळांनी समाजभान ठेवून उत्सव साजरा करावा, असे आवाहन पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले. महापालिकेने मूर्तीदान उपक्रमाचा विचार करावा आणि त्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. मंडळांनी ‘ऑनलाईन’ माध्यमातून कार्यक्रम घ्यावेत आदी सूत्रांवर या वेळी एकमत झाले.