नम्रता, सेवेची तळमळ आणि गुरुदेवांवर नितांत श्रद्धा असलेल्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सिंहगड रस्ता, पुणे येथील सौ. स्नेहल केतन पाटील (वय २४ वर्षे) !

‘सौ. स्नेहल केतन पाटील (पूर्वाश्रमीच्या स्नेहल गुब्याड) इलेक्ट्रॉनिक अभियंता असून वर्ष २०१९ मध्ये त्या सांगली येथील वालचंद महाविद्यालयातून दुसर्‍या आल्या आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना त्या सनातनच्या मिरज आश्रमात रहात होत्या. पुण्यातील साधिकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सौ. स्नेहल केतन पाटील

१. काटकसरी वृत्ती

‘स्नेहलताई स्वभावाने पुष्कळ शांत आहे. ती काटकसरी आहे. तिच्याकडे मोजकेच साहित्य असते. ती अनावश्यक पैसे व्यय करत नाही.

२. नोकरी करून घरातील दायित्व चांगल्या प्रकारे पार पाडणे

जुलै २०१९ मध्ये तिच्या वडिलांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यामुळे घराचे दायित्व तिच्यावर आले; परंतु ती त्याविषयी कधी तक्रार करत नाही. तिला ३ लहान बहिणी आणि १ भाऊ आहे. या स्थितीत ती नोकरी करून घरातील दायित्व चांगल्या प्रकारे पार पाडते. भावंडांना ती साधनेच्या स्तरावर साहाय्य करते. आईचा साधनेला विरोध असला, तरी कोणतीही अपेक्षा न ठेवता ती साधनेचे प्रयत्न करते. इतक्या लहान वयातही तिला स्वतःच्या दायित्वाची जाणीव आहे. उद्धटपणे न बोलणे, सांगेल ते ऐकणे आणि स्वीकारणे या गुणांमुळे तिच्यातील प्रगल्भता दिसून येते.’

– सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) आणि श्री. महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के)

३. स्नेहलताईशी बोलतांना आनंद मिळणे

‘स्नेहलताई नेहमी आनंदी असते. तिचे बोलणे प्रेमळ आणि नम्र आहे. तिचे बोलणे ऐकत रहावेसे वाटते. तिच्या बोलण्यात बालकभाव जाणवून तिच्याशी बोलतांना आनंद मिळतो. ती सर्व साधकांसमवेत मिळून-मिसळून रहाते. तिच्याकडे पाहिल्यावर ‘तिची साधना अंतर्मनातून चालू आहे’, असे जाणवते.’

– सौ. मनीषा पाठक, सौ. राजश्री खोल्लम आणि सौ. राधा सोनवणे

४. सेवेची तळमळ

४ अ. ‘सोशल मिडिया’ची सेवा दायित्व घेऊन तळमळीने करणे : ‘अनेक सेवा असल्या, तरी स्नेहलताई ताण न घेता सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. ती ‘सोशल मिडिया’ची सेवा दायित्व घेऊन तळमळीने करते. ‘या सेवेच्या अंतर्गत असणारी सर्व सूत्रे साधकांपर्यंत पोचावीत, तसेच धर्मप्रेमींचाही सेवेत सहभाग असावा’, अशी तिची तळमळ असते. जिल्ह्यातील वाचक आणि धर्मप्रेमी यांना संगणकीय प्रणाली ‘डाऊनलोड’ करता यावी; म्हणून तिने सर्वांना लगेच समजेल, अशी एक चित्रफीत बनवली आहे. तिने केलेल्या प्रयत्नांमुळे पुणे आणि सोलापूर हिंदु जनजागृती समितीच्या ‘फेसबूक पेज’चा वाचकवर्ग (रीच) वाढला आहे. या सेवेत तिने नवीन साधकांनाही घडवले आहे.

४ आ. रात्री सेवा करून झोपायला विलंब झाला, तरी ती सकाळी लवकर उठून आश्रमातील पूजेची सेवा करते.’

– श्री. महेश पाठक आणि सौ. मनीषा पाठक

५. साधनेची तळमळ

५ अ. प्रत्येक प्रसंगातून साधना व्हावी, यासाठी प्रयत्न करणे : ‘नोकरीनिमित्त नवीन शहरात रहायला आल्यानंतर तेथील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी तिला संघर्ष करावा लागला; परंतु गुरुदेवांवर ठाम श्रद्धा ठेवून तिने ‘प्रत्येक प्रसंगातून साधना म्हणून कसे प्रयत्न करायला हवेत ?’, हे जाणून घेऊन प्रयत्न केले. ताई साधनेतील अडचणींविषयी मोकळेपणाने विचारून घेते आणि सांगितलेले उपायही लगेच करते.

५ आ. सद्गुरु स्वातीताईंशी मोकळेपणाने बोलून त्यांचे मार्गदर्शन घेणे : तिच्या वागण्या-बोलण्यात इलेक्ट्रॉनिक अभियंता असल्याचा कोणताच अहं नसतो. आधीच्या तुलनेत ताईवरील आवरण न्यून झाल्याचे जाणवते. ती वेळोवेळी मनातील संघर्ष आणि प्रसंग सद्गुरु स्वातीताईंशी मोकळेपणाने बोलते.

६. भाव 

अ. ‘मिरज आश्रमात रहात असतांना तिला पू. जोशीआजोबांचा सत्संग मिळाला. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतांना तिची भावजागृती होते. ‘त्यांनी दिलेले साधनेचे दृष्टीकोन तिच्या अंतर्मनावर बिंबले आहेत’, असे जाणवते. ती नोकरी, सेवा आणि आश्रम या ठिकाणी कोणतीही कृती करतांना भगवंताच्या अनुसंधानात असते. ‘तिने काढलेली श्रीकृष्णाची चित्रे बघत रहावीत’, असे वाटते.’

– सौ. मनीषा पाठक

आ. ‘ताई एकटी रहात असे. दळणवळण बंदीमुळे तिच्याशी भ्रमणभाषवरून संपर्क होतो. एकदा मी तिला विचारले, ‘‘रात्री झोपतांना तुला भीती वाटत नाही का ?’’ ती म्हणाली, ‘‘काकू, गुरुदेव सूक्ष्मातून आहेतच आणि तुम्ही सर्व जण एवढी विचारपूस करता, काळजी घेता. त्यामुळे भीती वाटत नाही.’’

– सौ. राधा सोनवणे (जून २०२०)

‘या धारिकेचे प्राथमिक संकलन करतांना मला पुष्कळ आनंद होत होता.’ – सौ. राजश्री खोल्लम, पुणे

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक