‘आर्य चाणक्य, स्वामी विद्यारण्य आणि समर्थ रामदासस्वामी यांनी आदर्श अन् समर्थ राज्याच्या उभारणीचे ध्येय ठेवले अन् त्यांचे शिष्य अनुक्रमे सम्राट चंद्रगुप्त मौर्य, हरिहर-बुक्कराय आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी ते पूर्ण केले. या शिष्यांनी निःस्वार्थी वृत्तीने आणि सेवाभावाने हे कार्य केल्याने त्या कार्याला गुरूंच्या कृपेचे पाठबळ लाभले; म्हणून ते कार्य यशस्वी झाले. यासाठीच प्राचीन काळापासून भारतातील राजांच्या राजसभेत राजगुरु (उदा. राजा दशरथाचे राजगुरु वसिष्ठऋषि) असायचे. आजच्या धर्मनिरपेक्ष राजवटीत जेथे धर्मालाच स्थान नाही, तेथे राजगुरूंना स्थान काय असणार ? ‘राजसत्तेला धर्मसत्तेचे अधिष्ठान नसल्यामुळेच आज राष्ट्राचे अध:पतन झाले आहे’, हे शासनकर्ते लक्षात घेतील का ?
आज परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी आदर्श अशा हिंदु राष्ट्राचे (सनातन धर्म राज्याचे) ध्येय ठेवले आहे. केवळ सनातन संस्थेचे साधकच नव्हेत, तर अनेक धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ त्यासाठी निःस्वार्थी वृत्तीने आणि सेवाभावाने झटत असल्यानेच या कार्याला ईश्वराचा आशीर्वाद आहे. यामुळेच हे कार्य यशस्वी होईल, याची निश्चिती बाळगा !’
– (पू.) श्री. संदीप आळशी (वर्ष २०१७)