उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. वेदश्री रामेश्वर भुकन ही आहे !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना सिद्ध केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु डॉ. आठवले) |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’– (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
श्रावण शुक्ल पक्ष पंचमी (नागपंचमी, १३.८.२०२१) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. वेदश्री रामेश्वर भुकन हिचा ८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिचे आई-वडील आणि साधिका यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
कु. वेदश्री रामेश्वर भुकन हिला ८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
(‘वर्ष २०१८ मध्ये कु. वेदश्री हिची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के होती.’ – संकलक)
सौ. उर्मिला भुकन (कु. वेदश्रीची आई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. ‘कु. वेदश्री वर्गातील मैत्रिणींशी भांडत नाही. ती सर्वांना साहाय्य करते’, असे तिच्या शिक्षिका मला सांगतात.
२. तिच्याकडे असणार्या वस्तू (‘क्राफ्ट’ पेपर (विविध प्रकारच्या हस्तकलांसाठी वापरण्यात येणारे कागद), पेन्सिल, खोडरबर किंवा अन्य वस्तू)) ती तिच्या वर्गातील मुलांना वापरायला देते. तिला त्यातून आनंद मिळतो.
३. समंजसपणा
‘वेदश्रीला शाळेत जायला उशीर व्हायला नको’, या विचाराने तिचे आवरतांना मला ताण येतो. त्यामुळे मी कधी कधी तिच्यावर रागावते, चिडते किंवा तिच्या मागे लागते. तेव्हा ती मला सांगते, ‘‘आई, आपण नामजप करत किंवा ‘पंचमहाभूताष्टक’ म्हणत माझे सर्व आवरूया.’’
४. वेदश्रीने शाळेत बाकाखाली पडलेली पेन्सिल उचलून घरी आणल्यावर आईने तिला तिच्या अयोग्य कृतीची जाणीव करून देणे आणि त्याविषयी खंत वाटल्याने वेदश्रीने तिच्या शिक्षिकेला पेन्सिल परत देऊन त्यांची क्षमा मागणे
एकदा वेदश्रीने शाळेत बाकाखाली पडलेली पेन्सिल उचलून स्वतःच्या समवेत आणली. मला ती तिच्या दप्तरात दिसली; म्हणून मी याविषयी तिला विचारले, ‘‘ही पेन्सिल तुझी नाही. मग कुणाची पेन्सिल आणलीस ?’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘आई, पेन्सिल बाकाखाली पडली होती; म्हणून मी आणली.’’ मी तिला सांगितले, ‘‘बाळा, जी वस्तू आपली नाही, ती कधीच घ्यायची नाही. असे केलेले परात्पर गुरु डॉक्टरांना आवडत नाही. इतरांची वस्तू घेणे चुकीचे आहे. त्यामुळे आपली साधना व्यय होते आणि आपल्याला त्याचे पाप लागते.’’ हे ऐकल्यावर ‘तिला तिच्या अयोग्य कृतीची खंत वाटून ती सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांकडे क्षमायाचना करत आहे’, असे मला जाणवले. दुसर्या दिवशी शाळेत गेल्यावर तिने तिच्या शिक्षिकेला ती पेन्सिल दिली आणि घडलेला सर्व प्रसंग सांगून स्वतःचे कान धरून त्यांची क्षमाही मागितली.
५. वडील प्रसारसेवेसाठी बाहेरगावी जाण्यास निघतांना रडणार्या आई आणि आजी यांना सकारात्मक दृष्टीकोन देणारी अन् मायेपासून अलिप्त असणारी कु. वेदश्री !
वेदश्रीचे वडील (श्री. रामेश्वर भुकन) प्रसाराच्या सेवेनिमित्त बाहेरगावी असतात. पुष्कळ दिवसांनी ते आम्हाला भेटायला आले होते. काही कालावधीने ते परत जाण्यासाठी निघत असतांना मला आणि वेदश्रीच्या आजीला (श्री. रामेश्वर भुकन यांची आई श्रीमती इंदुबाई भुकन (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) यांना) रडायला येत होते. तेव्हा वेदश्रीने आम्हाला सांगितले, ‘‘आई आणि आजी, रडायचे नाही. बाबा सेवेसाठी बाहेर जात आहेत. त्यांना आनंदाने हसत निरोप देऊया.’’ तिचे बोलणे ऐकून आम्हाला आमच्यातील ‘भावनाशीलता’ या स्वभावदोषाची जाणीव झाली. त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने जन्माला आलेली दैवी बालके मायेत अडकत नाहीत. ती केवळ साधना करण्यासाठीच जन्माला आली असून गुरुदेवांना अपेक्षित अशी साधना करत आहेत.’
६. भावपूर्ण सेवा करून संतांचे मन जिंकणे
जानेवारी २०२१ मध्ये मी आणि वेदश्री तिचे वडील श्री. रामेश्वर भुकन (माझे यजमान) यांना भेटण्यासाठी नगर सेवाकेंद्रात गेलो होतो. त्या कालावधीत आम्ही पू. प्रा. अशोक नेवासकरकाकांना (‘पू. (कै.) प्रा. अशोक नेवासकरकाका यांनी १२.३.२०२१ या दिवशी देहत्याग केला आहे.’ – संकलक) भेटलो. वेदश्रीने पू. काका आणि काकू (त्यांच्या पत्नी) यांच्या चरणांवर डोके ठेवून भावपूर्ण नमस्कार केला. मी आणि वेदश्रीचे बाबा पू. काकांच्या घराच्या स्वच्छतेचे नियोजन करत होतो. तेव्हा वेदश्री म्हणाली, ‘‘मीही स्वच्छतेच्या सेवेला येऊ का ?’’ तिने स्वच्छतेची सेवा भावपूर्णरित्या केली. वेदश्री सेवा करतांना उत्साही दिसत होती. तिची सेवावृत्ती पाहून पू. काका आणि काकू (त्यांच्या पत्नी) यांना तिचे पुष्कळ कौतुक वाटले. त्यांनी तिला खाऊ अन् आशीर्वादस्वरूप भेटवस्तू दिली. तेव्हा ‘हे सर्व ती प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने शिकली आहे’, याची जाणीव होऊन माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.
७. संतांप्रती भाव असणारी कु. वेदश्री !
एकदा घरी आम्ही सर्व जण एकत्र जेवायला बसलो होतो. तेव्हा पू. आजींना (वेदश्रीची पणजी, सनातनच्या ६४ व्या संत पू. (श्रीमती) शेऊबाई लोखंडेआजी (वय ८५ वर्षे) यांना) एक पदार्थ हवा होता. त्यांनी ते शब्दांत न सांगता बोटाने खुणवून दाखवले. ‘जेवणात अनेक पदार्थ असल्यामुळे पू. आजींना कोणता पदार्थ हवा आहे ?’, हे मला नेमके कळले नाही. त्यामुळे ‘पू. आजींनी पदार्थाचे नाव सांगितल्यास द्यायला सोपे जाईल’, असा विचार माझ्या मनात आला. ‘आजी नेहमी असेच करतात’, असे मी बोलूनही दाखवले. त्या वेळी वेदश्री मला म्हणाली, ‘‘आई, त्या वयस्कर असल्यामुळे त्यांना पदार्थाचे नाव पटकन आठवत नसेल. त्या संत असल्यामुळे तूच पदार्थांची नावे सांगून ‘त्यांना काय हवे आहे ?’, असे विचार.’’ वेदश्रीचे हे बोलणे ऐकून मी अंतर्मुख झाले आणि मला माझी चूक लक्षात आली.’ (१८.७.२०२१)
श्री. रामेश्वर भुकन (कु. वेदश्रीचे वडील), नगर सेवाकेंद्र
१. अल्प कालावधीत जवळीक साधणे
‘वेदश्री प्रत्येकाची लगेच ओळख करून घेते आणि अल्प कालावधीत सर्वांशी जवळीक साधते. त्यामुळे ती समोर नसतांनाही अनेक जण तिची आठवण काढतात.
२. व्यवस्थितपणा
ती नगर सेवाकेंद्रात असतांना आम्ही तिला स्वच्छतेच्या सेवा करायला सांगितल्या नव्हत्या, तरीही तिने एका वहीत सेवा लिहून काढून ‘कोणत्या सेवा झाल्या आहेत किंवा कोणत्या झालेल्या नाहीत ?’, यांविषयीच्या खुणा करण्यासाठी उभे स्तंभ आखले होते. तिने ती वही व्यवस्थित ठेवल्यामुळे सात्त्विक वाटते. वहीकडे पाहिल्यावर मला आनंद मिळतो.
३. व्यष्टी साधनेचे प्रयत्न चिकाटीने करणे
मी काही दिवस तिच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेत होतो. तेव्हा ती गुरुदेवांना अपेक्षित असे व्यष्टी साधनेचे प्रयत्न आणि स्वयंसूचनांची १२ सत्रे चिकाटीने करण्याचा प्रयत्न करत होती.’ (१८.७.२०२१)
कु. मोक्षदा पाटील (वय ८ वर्षे, आध्यात्मिक पातळी ५५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. ‘मला वेदश्रीकडे बघून ‘ती सतत देवाचे नामस्मरण करत आहे’, असे जाणवते. तिच्या तोंडवळ्याकडे पाहून मला चैतन्य जाणवते.
२. वेदश्री कोणत्याही प्रसंगात स्थिर असते.
३. जेव्हा आमच्यात भांडण होते किंवा आम्ही अबोला धरतो, तेव्हा ती नंतर त्याविषयी माझी क्षमाही मागते.
४. वेदश्री तिच्या आईचे सर्व ऐकते आणि प्रत्येक गोष्ट आईला विचारून करते.
५. एकदा तिला तिच्या आईच्या समवेत गावाला जाण्याची इच्छा होती; परंतु आईने कोरोनाची परिस्थिती समजावून सांगितल्यावर ती गावाला न जाता तिच्या आजीच्या समवेत आनंदाने रामनाथी आश्रमातच थांबली.’ (१८.७.२०२१)
कु. सोनाली खटावकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
स्वतःची वस्तू सहजतेने इतरांना देणे
‘मला एका संतांच्या खोलीतील देवतेच्या चित्रासाठी मण्यांचा हार बनवायचा होता. त्या वेळी मी वेदश्रीला विचारले, ‘‘तुझ्याकडे माळेतील मणी आहेत का ?’’ ती लगेच म्हणाली, ‘‘हो. माझ्याकडे आहेत. मी देते.’’ ‘ती इतकी लहान असूनही तिने सहजतेने तिची वस्तू मला दिली’, याचे मला कौतुक वाटले.’ (१८.७.२०२१)
वेदश्रीचे स्वभावदोष
‘आळशीपणा, अभ्यासाचे गांभीर्य नसणे आणि स्वकौतुकाची अपेक्षा असणे.’ – सौ. उर्मिला भुकन (१८.७.२०२१)
कु. वेदश्री भुकन (वय ८ वर्षे) हिला दत्तमाला मंत्रपठण करतांना आलेली अनुभूती
दत्तमाला मंत्रपठण करत असतांना तेथे सूक्ष्मातून योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन बसलेले दिसणे आणि ‘त्यांनी माझे कौतुक करून डोक्यावर हात ठेवला’, असे जाणवणे : ‘६.८.२०२१ या दिवशी मी दत्तमाला मंत्रपठण करत होते. त्या वेळी मला सूक्ष्मातून ‘माझ्यासमोर योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन बसले आहेत’, असे दिसले. ते आसंदीवर (खुर्चीवर) बसले होते. मंत्रपठण झाल्यावर ते मला म्हणाले, ‘‘तू मंत्रपठण छान केलेस !’’ त्यानंतर ‘त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला’, असे मला जाणवले.’ – कु. वेदश्री भुकन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.८.२०२१)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |