१३ ऑगस्ट २०२१ या दिवशी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यांना ९९ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने…
जगप्रसिद्ध मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार आणि वक्ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी २९ जुलै २०२१ या दिवशी दिनांकानुसार ९९ वर्षे पूर्ण करुन १०० व्या वर्षांत पदार्पण केले आहे. आज १३ ऑगस्ट २०२१ या दिवशी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा तिथीनुसार वाढदिवस आहे. ते इतिहासाचे मोठे डोळस उपासक आणि भक्त आहेत. जाणत्या इतिहासकारांनी घालून दिलेले दंडक सांभाळून शिवचरित्र आणि त्या अनुषंगाने इतर इतिहासविषयक लिखाण सामान्यांपर्यंत अत्यंत सचित्र भाषेत पोचवण्याचे कार्य त्यांनी केले आहे. इतिहासाविषयी अभिमान, सत्यता पडताळण्याची संशोधक वृत्ती, संयम, चिकाटी, अचाट स्मरणशक्ती आदी गुणांचा समुच्चय बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्यक्तीमत्त्वामध्ये आहे. त्यांच्या कार्याविषयीची माहिती या लेखात देत आहोत.
संकलक – श्री. सचिन कौलकर, पुणे.
१. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा परिचय
शिवशाहीर बळवंत मोरेश्वर पुरंदरे उपाख्य बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म २९ जुलै १९२२ या दिवशी पुणे जिल्ह्यातील सासवड येथे झाला. त्यांच्या पत्नीचे नाव कै. निर्मला, तर त्यांना माधुरी पुरंदरे, प्रसाद पुरंदरे आणि अमृत पुरंदरे, अशी ३ मुले आहेत. बाबासाहेबांच्या पत्नी कै. निर्मला पुरंदरे या त्यांच्या शिक्षणविषयक कार्यासाठी प्रसिद्ध होत्या आणि त्यांना ‘पुण्यभूषण’ पुरस्कार मिळाला होता. बाबासाहेबांच्या कन्या माधुरी पुरंदरे एक गायिका आणि लेखिका आहेत.
२. वयाच्या १४ व्या वर्षांपासून इतिहास आणि शिवचरित्र यांच्याशी एकरूप होऊन कार्य करणे
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या १४ व्या वर्षांपासून इतिहास आणि विशेषतः शिवचरित्र यांच्याशी एकरूप होऊन आणि झोकून देऊन कार्य केले आहे. ही त्यांची मोठी तपश्चर्या आहे. त्यांच्यामध्ये प्रखर बुद्धीमत्ता, विश्लेषण क्षमता, प्रेरणादायी इतिहास लिहिण्यासाठीची विलक्षण लेखन-प्रतिभा आणि वक्तृत्वकला हे गुणविशेषही त्यांच्या व्यक्तीमत्त्वात आहेत, तसेच सखोल अभ्यासासह, शिस्तबद्धता, वक्तशीरपणा ही त्यांच्या स्वभावाची खास वैशिष्ट्ये आहेत.
३. छत्रपती शिवाजी महाराजांवर १२ सहस्रांहून अधिक व्याख्याने
बाबासाहेब पुरंदरे हे तरुणपणापासून पुणे येथेच स्थायिक होऊन ते ‘भारत इतिहास संशोधक मंडळ’ या संस्थेत काम करू लागले होते. या ठिकाणीच इतिहाससंशोधक ग.ह. खरे हे बाबासाहेबांना गुरुस्थानी लाभले आणि इतिहास संशोधक म्हणून त्यांची वाटचाल चालू झाली. पुणे विद्यापिठाच्या ‘मराठा इतिहासाची शकावली-वर्ष १७४० ते १७६१’ या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब संशोधक म्हणून सहभागी झाले होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वर्ष २०१५ पर्यंत १२ सहस्रांहून अधिक व्याख्याने दिली आहेत. अशी व्याख्याने आतापर्यंत कुणीही दिलेली नाहीत.
४. गडकिल्ले, मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक कागदपत्रे यांचा सखोल अभ्यास
इतिहासाचा ध्यास घेतलेले बाबासाहेब हे तरुणपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळून संपर्कात होते. त्या काळातच ते प्रल्हाद केशव अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन करत होते. याखेरीज त्यांचे मेहुणे श्री.ग. माजगावकर यांच्या समवेत ते काम करत होते. पुढे ज्येष्ठ इतिहासकार आणि कादंबरीकार गो.नी. दांडेकर यांच्याशी त्यांची भेट झाली. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ले, मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक कागदपत्रे यांचा सखोल अभ्यास केला आहे.
५. दादरा-नगर हवेली मुक्ती संग्रामात सहभाग !
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पोर्तुगिजांच्या कह्यातील भारताचा उर्वरित भाग परत मिळवण्यासाठी दादरा-नगर हवेली मुक्ती संग्राम लढला गेला. या संग्रामात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे दिवंगत गायक सुधीर फडके यांच्या समवेत सहभागी झाले होते.
६. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे अथक संशोधन आणि परिश्रम यांतून साकारलेला ‘राजा शिवछत्रपती’ ग्रंथ अन् त्यांनी केलेले अन्य विपुल लेखन !
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन, तसेच नाट्यलेखन आणि ‘जाणता राजा’ या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. पुरंदर्यांची दौलत, पुरंदर्यांची नौबत, पुरंदरच्या बुरुजावरून, पुरंदर्यांचा सरकारवाडा, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड आणि राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर प्रकाशित झालेले साहित्य आहे. राजा शिवछत्रपती पूर्वार्ध आणि उत्तरार्ध (या पुस्तकाची वर्ष २०१४ मध्ये इंग्रजी भाषेतील आवृत्तीही प्रकाशित झाली आहे.) ‘शिवचरित्र हे घरोघरी पोचावे’, हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधन आणि परिश्रम यांतून ‘राजा शिवछत्रपती’ हा ग्रंथ साकार केला. बाबासाहेब पुरंदरे यांनी अनेक ऐतिहासिक कागदपत्रे स्वतः पडताळून ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाची १७ वी आवृत्ती ३१ मार्च २०१४ या दिवशी ‘गुढीपाडवा’ या दिवशी प्रसिद्ध झाली. पूर्वी एकच असलेले हे पुस्तक आता २ खंडांत विभागले आहे.
आग्रा, कलावंतिणीचा सज्जा, पन्हाळगड, प्रतापगड, फुलवंती, महाराज, मुजर्याचे मानकरी, राजगड, लालमहाल, शिलंगणाचं सोनं, सावित्री आणि सिंहगड आदी विविध पुस्तकांचे लेखन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे केले आहे. या व्यतिरिक्त बाबासाहेब पुरंदरे यांचे ‘कथाकथन – भाग १ ते ३ (कॅसेट्स आणि सीडीज)’, ‘शिवचरित्र कथन भाग १ ते १५’ याच्या कॅसेट्स आणि सीडीज आहेत.
७. ‘जाणता राजा’ या महानाट्याचे १ सहस्र २५० हून अधिक यशस्वी प्रयोग !
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी ‘फुलवंती’ आणि ‘जाणता राजा’ ही नाटके लिहिली, तसेच दिग्दर्शित केली आहेत. ‘जाणता राजा’ हे आशिया खंडातील ‘महानाट्य’ म्हणून प्रसिद्ध आहे. ‘जाणता राजा’ या महानाट्याचे गेल्या २७ वर्षांत १ सहस्र २५० हून अधिक प्रयोग झाले आहेत. पहिला प्रयोग १४ एप्रिल १९८४ या दिवशी झाला होता. ‘जाणता राजा’ या नाटकामध्ये १५० कलावंत आणि हत्ती घोडेही सहभागी होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राच्या प्रसारासाठी काही उपक्रम चालवले. देश-विदेशांतही त्यांच्या व्याख्यानांतून आणि ‘जाणता राजा’ या महानाट्यातून आजही छत्रपती शिवरायांचे चरित्र जिवंत केले होते. ‘हे चरित्र व्यक्तीचारित्र्य निर्मितीचा अभ्यासक्रम आहे’, हे त्यांनी त्या चरित्रातील अनेक पैलू उलगडून दाखवत आपल्या व्याख्यानांमधून पटवून दिले.
८. विविध उत्पन्नातून मिळालेले लाखो रुपये साहाय्य म्हणून अनेक संस्थांना देणे
बाबासाहेबांनी पुस्तकांची विक्री आणि व्याख्यान देण्यासाठी मिळणारे मानधन यांतून मिळालेले लाखो रुपये त्यांनी विविध संस्थांना दान केले आहेत. ‘महाराष्ट्र भूषण’ या सन्मानासमवेत १० लाख रुपयांतील केवळ १० पैसे स्वतःजवळ ठेवून उरलेल्या रकमेत आणखी १५ लाख रुपये घालून ती सर्व रक्कम ‘कॅन्सर रुग्णालया’ला त्यांनी दान केली. ‘जाणता राजा’ या नाटकाच्या या प्रयोगांच्या उत्पन्नातून त्यांनी अनेक संस्थांना लाखो रुपयांचे साहाय्य केले आहे.
९. महाराष्ट्र सरकारकडून बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ सर्वाेच्च पुरस्कार घोषित !
१९ ऑगस्ट २०१५ या दिवशी महाराष्ट्र सरकारने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान केला आहे. त्या दिवशी बाबासाहेबांचा तिथीनुसार ९३ वा वाढदिवस होता. हा पुरस्कार जेव्हा घोषित झाला, तेव्हा काही हिंदुद्वेष्ट्यांनी त्याला विरोध केला होता. त्यांच्या मते बाबासाहेब हे एक ललित लेखक असून इतिहाससंशोधक नाहीत. या वेळी पुरंदरे यांच्या योग्यतेचे दाखले घेऊन त्यांच्या समर्थनासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना, प्रतिष्ठित मान्यवर आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे बाबासाहेब पुरंदरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते.
१०. समाजातील अनेक मान्यवरांकडून बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याचा गौरव
अ. अनेक मान्यवर बाबासाहेबांना ‘इतिहास संशोधक’ मानतात. राजमाता सुमित्राराजे भोसले, इतिहास संशोधक न.र. फाटक, कवी कुसुमाग्रज, सेतुमाधवराव पगडी, आचार्य अत्रे, प्राचार्य शिवाजीराव भोसले, नरहर कुरुंदकर, लता मंगेशकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आदी नामवंतांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला आहे.
आ. डी.वाय. पाटील यांच्या अभिमत विद्यापिठाने त्यांच्या इतिहास संशोधनातील योगदानाविषयी खासदार शरद पवार यांच्या हस्ते त्यांना ‘डी.लिट’ ही सन्माननीय पदवी देऊन गौरवले होते.
११. बाबासाहेब पुरंदरे यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार
२१ फेब्रुवारी २०१६ मध्ये ‘गार्डियन-गिरिप्रेमी जीवनगौरव’ पुरस्कार, वर्ष २०१२ मध्ये ‘प्राचार्य शिवाजीराव भोसले’ स्मृती पुरस्कार, वर्ष २०१५ मध्ये ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार, तर वर्ष २०१९ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘बेलभंडारा’ या नावाने बाबासाहेब पुरंदरे यांचे सचित्र चरित्र डॉ. सागर देशपांडे यांनी लिहून प्रसिद्ध केले आहे.
१. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी व्यक्त केलेले विचार
छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजाला चारित्र्य आणि राष्ट्रीय विचार दिला !छत्रपती शिवाजी महाराजांनी चारित्र्य आणि राष्ट्रीय विचार दिले आहेत. शिवरायांचे चरित्र म्हणजे केवळ युद्ध नव्हे. प्रत्येकाने सीमेवर जाऊन रक्त सांडले पाहिजे, असे नाही. राष्ट्रभावना जागृत ठेवत आपण ज्या क्षेत्रात जे काम करत असू, ते अगदी चोखपणे आणि प्रामाणिकपणे केले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या प्रामाणिक कामातूनच राष्ट्र घडत असते. व्यक्तीगत आयुष्यात कसे असले पाहिजे, हे शिकवणारे चारित्र्य शिवरायांकडे पाहून शिकता येते. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजच्या सामाजिक-राजकीय जीवनातही आदर्शवत् आणि अनुकरणीय आहे. त्याचा अभ्यास केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या अपार श्रद्धेतूनच मी लहानपणापासूनच शिवचरित्राकडे वळलो. आजही पहाटे ३.३० वाजता उठून केवळ वाचन, वाचन आणि वाचनच करतो. शिवचरित्राच्या माध्यमातून आयुष्यात पुष्कळ पैसे मिळाले आहेत. ते या हाताचे त्या हाताला न कळू देता समाजासाठी व्ययही केले; पण त्याहून आयुष्याची कमाई काय, तर जिवाभावाची मिळालेली माणसे होय. (पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ३ ऑगस्ट २०२१ या दिवशी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केलेले विचार) २. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा विचार ‘‘माझ्या रचनेतील चुका दाखवा. पुढील आवृत्तीत दुरुस्त करीन. इतिहास ही माझी एकट्याची मिरास नाही. ते सार्यांचे धन आहे. त्यात कुठे हीन आले असेल, तर ते पाखडून फेकून द्यायला हवे.’’ |