१. चारचाकी गाडीला झालेला भीषण अपघात
१ अ. मुंबईहून जळगावला जातांना गाडी खड्ड्यात आदळल्याने चाकाची ‘रिम’ वाकडी होऊन गाडीचा ‘ब्रेक’ नादुरुस्त होणे, मागे बसलेल्या सौ. किरण वाघुळदे पुढच्या काचेवर जाऊन आदळणे आणि ‘परम पूज्य’ असा धावा करतांना त्यांना गाडीत परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन होणे : ‘२९.८.२०२० या दिवशी माझ्या सासूबाई सौ. किरण वाघुळदे यांच्यावर वैद्यकीय उपचार झाल्यानंतर आम्ही मुंबईहून जळगावला जात होतो. गाडी मुंबई-जळगाव महामार्गावरील धुळे येथील आर्वी गावाच्या परिसरातून जात असतांना आमच्या चारचाकी गाडीचे मागचे चाक खड्ड्यात आपटले आणि चाकाची ‘रिम’ वाकडी झाली. यामुळे गाडीचे संतुलन बिघडून (इम्बॅलन्स होऊन) मागच्या चाकाच्या ‘ब्रेकची डिस्क’ तुटली आणि गाडीचा ‘ब्रेक’ नादुरुस्त झाला. गाडी खड्ड्यात आदळल्याने मागे बसलेल्या सौ. किरण वाघुळदे आसनावरून फेकल्या जाऊन गाडीच्या समोरच्या काचेवर आदळल्या. या वेळी त्या ‘परम पूज्य’ ‘परम पूज्य’, असा मोठ्याने धावा करत होत्या. त्यांना ‘गाडीमध्ये परात्पर गुरु डॉक्टर पांढरा सदरा घालून उभे आहेत’, असे दिसले.
१ आ. ‘ब्रेक’ न लागल्याने गाडी मार्गाच्या शेजारी असलेल्या लोखंडी भिंतीला घासत सिमेंटच्या भिंतीवर आदळून थांबणे अन् गाडीत असलेल्या कुणालाही गंभीर दुखापत न होणे : गाडीचा ‘ब्रेक’ न लागल्याने गाडी कुठेतरी आदळून थांबणार’, हे नक्की होते. मी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केल्यावर ‘ब्रेक’ न लागल्याने तो प्रयत्न अपयशी ठरला. केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळे गाडी आपोआप मार्गाच्या शेजारी असलेल्या एका लोखंडी सुरक्षा भिंतीला घासत गेली आणि एका सिमेंटच्या भिंतीवर आदळून थांबली. गाडीमध्ये असलेल्या सौ. किरण वाघुळदे, सौ. सायली चौधरी, कु. स्वानंदी मांजरेकर आणि मी यांना गुरुकृपेमुळे कोणत्याही प्रकारची गंभीर दुखापत झाली नाही.
२. अपघाताच्या वेळी अनुभवलेली गुरुकृपा
२ अ. ‘गाडीचा ‘ब्रेक’ निकामी झाल्यानंतर मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले असते’, असे सर्व घटनाक्रम पहाता लक्षात येणे आणि ‘केवळ गुरुदेवांच्या कृपेने साधकांवरील आक्रमण गाडीवर निभावले’, हे जाणवणे : नंतर हा सर्व घटनाक्रम पहातांना ‘गाडीचा ‘ब्रेक’ निकामी झाल्यानंतर गाडी समोरून येणार्या एखाद्या गाडीला अथवा एखाद्या माणसाला धडकली असती, तर आम्हाला मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले असते’, असे जाणवले. हा महामार्ग असल्याने येथे सतत भरधाव वेगाने वाहनांची वर्दळ चालू असते; मात्र आमच्या गाडीचा अपघात झाल्यावर पाठीमागून कोणतीही गाडी आली नाही आणि मोठा अनर्थ न घडून आम्हाला गंभीर दुखापतही झाली नाही. ‘आमच्यावर झालेले आक्रमण गुरुदेवांच्या कृपेमुळे केवळ गाडीवर निभावले’, हे आम्हाला क्षणोक्षणी जाणवत होते.
२ आ. पत्नीने लहान मुलीसह जळगावला येणे आदल्या दिवशी रहित करणे : आमच्या समवेत डोंबिवली येथून माझी पत्नी सौ. मंजिरी आणि लहान मुलगी कु. निर्मयी येणार असल्याचे ठरले होते; मात्र आदल्या दिवशी ‘आता जायला नको’, असा विचार सौ. मंजिरीच्या मनात आला आणि त्यांचे यायचे रहित झाले. तेव्हा ‘देवानेच त्यांना हे सुचवले’, असे मला जाणवले.
३. पोलिसांची अरेरावीची भूमिका
३ अ. ‘घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी त्यांच्या ठाण्यात नेल्यावर ‘एक किरकोळ गुन्हा नोंद करू’, असे सांगणे आणि हा रस्ता धुळे महामार्गावर असलेल्या टोल नाक्यापासून १० ते १२ किलोमीटरच्या अंतर्गत असल्याने या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्याचे दायित्व टोल वसूल करणार्यांचे असल्याचे पोलिसांना समजावून सांगणे : अपघात झालेल्या ठिकाणाच्या समोरच एक पोलीस ठाणे होते. घटनास्थळी आलेले पोलीस आम्हाला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. आमची विचारपूस झाल्यानंतर काही वेळाने त्यांनी ‘तुमच्यावर एक किरकोळ गुन्हा नोंद करू’, असे सांगितले. तेव्हा मी त्यांना घडलेला प्रकार सांगितला. या वेळी पोलीस आम्हाला म्हणाले, ‘‘या प्रकरणाविषयी आम्हाला वरच्या अधिकार्यांना सांगावे लागेल.’’ घडलेला प्रकार पोलिसांना समजावून सांगण्याचा आमचा प्रयत्न होता की, ‘हा धुळे येथे महामार्गावर असलेल्या टोल नाक्यापासून १० ते १२ किलोमीटरच्या अंतर्गत असलेला मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्याचे दायित्व टोल वसूल करणार्यांचे आहे.’
३ आ. गाडीचा वेग १२० च्या पुढे असल्याने अपघात झाला असल्याचे पोलिसांनी मनानेच ठरवून गुन्हा नोंद करण्याचे ठरवणे आणि एका हितचिंतकाने पोलिसांना संपर्क केल्यावर त्यांनी नरमाईची भूमिका घेणे : ‘आमच्या गाडीचा अपघात हा केवळ खड्ड्यात आपटल्याने गाडीचे ‘ब्रेक फेल’ झाल्यामुळे झालेला आहे, तसेच आमची गाडी अन्य गाडीला अथवा मार्गावरून चालणार्या माणसाला ठोकलेली नाही’, हे आम्ही पोलिसांना पटवून सांगण्याचा प्रयत्न करत होतो. पोलीस त्यांच्या मनाने ठरवत होते की, गाडीचा वेग १२० च्या पुढे असल्याने हा अपघात झाला आहे. (प्रत्यक्षात गाडीचा वेग ७० ते ८० च्या आसपास होता.) पोलीस गुन्हा नोंद करण्याच्या सूत्रावर ठाम होते; मात्र देवाच्या कृपेने एका हितचिंतकाने पोलिसांना संपर्क केला. त्यानंतर पोलिसांनी एकदम नरमाईची भूमिका घेत ‘तुम्ही या व्यक्तीच्या परिचयातील आहात’, हे आधीच सांगायचे ना’, असे म्हटले.
देवाच्या कृपेमुळे या कठीण प्रसंगी असे साहाय्य होऊ शकले. यातून पोलिसांची मानसिकताही अभ्यासता आली.
४. साधकांचे लाभलेले साहाय्य
या कठीण प्रसंगी धुळे येथील साधक श्री. पंकज बागुल यांनी घटनास्थळी येऊन स्थानिक परिस्थिती हाताळण्यासाठी साहाय्य केले. गाडी चालवण्याच्या स्थितीत नसल्याने ती दुसर्या गाडीवर ठेवून जळगावला न्यावी लागली. या वेळीही देवाच्या कृपेने साधकांचे साहाय्य मिळाल्याने गाडी त्याच दिवशी धुळे येथून जळगावला जवळपास १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘गॅरेज’मध्ये नेण्यात आली.
कठीण प्रसंगातून देवाने सुखरूप बाहेर आणल्याविषयी श्री गुरुदेवांप्रती कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. मंदार मांजरेकर, ठाणे (२६.१०.२०२०)
परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेनेच मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर येणे
१. गाडी बाजूच्या भिंतीला घासत जातांना ‘प.पू. गुरुदेवांनी ती अलगद हाताने बाजूला आणून उभी केली’, असे दृश्य दिसणे
‘गाडी जेव्हा बाजूला असलेल्या भिंतीला घासत गेली, तेव्हा मला प.पू. गुरुदेव समोरच्या भिंतीवर पांढर्या शुभ्र वस्त्रात उभे असलेले दिसले. ‘प.पू. गुरुदेवांनी गाडी अलगद हाताने बाजूला आणून उभी केली’, असे मला दिसले. तेव्हा ‘आम्ही चारही जण जणू काही गुरुदेवांच्या चरणांवर फुलेच उधळत आहोत, त्यांना समर्पित झालो आहोत’, असा भाव माझ्या मनात दाटून आला. मला प.पू. गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. त्यांच्या कृपेनेच आम्ही चारही जण मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर आलो.
२. वाहनदेवतेने काहीही दुखापत होऊ न देणे, ‘एवढा मोठा अपघात होऊनही सगळे सुखरूप आहेत’, हे पाहून जमलेल्या लोकांना पुष्कळ आश्चर्य वाटणे आणि ‘देवाची कृपा असल्याने वाचलात’, असे सर्वांनी सांगणे
‘वाहन देवतेने आमचे त्रास तिच्यावर ओढवून घेऊन आम्हाला काहीही दुखापत होऊ दिली नाही.’ हे आम्हाला जाणवले. ‘एवढा मोठा अपघात होऊनही आम्ही सगळे सुखरूप आहोत’, हे पाहून आमच्या सभोवती जमलेल्या सगळ्या लोकांना पुष्कळ आश्चर्य वाटले. सर्व जण ‘देवाची कृपा म्हणून तुम्ही वाचलात’, असे म्हणत होते. जळगावच्या घरी सद्गुरु जाधवकाकांचे लक्ष आमच्याकडे जातांना-येतांना होते. या प्रसंगात गुरुदेव आणि सद्गुरु जाधवकाका यांच्या कृपेनेच हे सर्व अनुभवता आले. त्याविषयी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. किरण वाघुळदे, विवेकानंदनगर, जळगाव. (२६.१०.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |