हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला निवेदन
कोल्हापूर, ११ ऑगस्ट (वार्ता.) – न्यायालयाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी शासनाला आदेश दिले असून त्यानुसार केंद्रीय आणि राज्य गृह विभाग, तसेच शिक्षण विभाग यांनी याविषयीचे परिपत्रकही काढले आहे. याचसमवेत महाराष्ट्र शासनानेही राज्यात ‘प्लास्टिक बंदी’चा निर्णय घेतल्याने त्यानुसारही ‘प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणे’, हे कायदाविरोधी आहे. तरी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करावी, या मागणीचे निवेदन १० ऑगस्ट या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. जिल्हाधिकार्यांच्या नावे असलेले हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी स्वीकारले.
या वेळी शिवसेना करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, शिवसेनेचे ‘संजय गांधी निराधार योजने’चे माजी अध्यक्ष श्री. किशोर घाटगे, शिवसेना उपशहरप्रमुख श्री. शशिकांत बीडकर, ‘हिंदु एकता आंदोलना’चे श्री. चंद्रकांत बराले, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.
गांधीनगर बाजारपेठांमधील दुकानांत प्लास्टिकचे ध्वज विक्रीसाठी असल्यास कारवाई करा ! – राजू यादव, करवीरतालुकाप्रमुख, शिवसेना
गांधीनगर (जिल्हा कोल्हापूर) – याच मागणीचे निवेदन ९ ऑगस्ट या दिवशी गांधीनगर (जिल्हा कोल्हापूर) पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार दिगंबर सुतार यांना देण्यात आले. या वेळी शिवसेनेचे करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव म्हणाले, ‘‘गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील मोठी बाजारपेठ असून येथूनच ग्रामीण भागात घाऊक दरात वस्तू विक्रीसाठी जातात. तरी या ठिकाणी कोणत्या दुकानात प्लास्टिकचे ध्वज असतील, तर त्वरित कारवाई करण्यात यावी.’’ ठाणे अंमलदारांनी त्वरित दुकानदारांना नोटीस काढण्याचे आश्वासन दिले.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, कामगार सेना जिल्हाप्रमुख श्री. राजू सांगावकर, सर्वश्री प्रफुल्ल घोरपडे, बाळासाहेब नलवडे, योगेश लोहार यांसह अन्य उपस्थित होते.
मिरज उपविभागीय कार्यालयात निवेदन सादर !
मिरज (जिल्हा सांगली) – मिरज येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात १० ऑगस्ट या दिवशी अव्वल कारकून हसन निडोनी यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वरील विषयाच्या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे उद्योजक आघाडीचे श्री. पंडित (तात्या) कराडे, सनातन संस्थेचे श्री. किरण कुलकर्णी, हिंदु जनजागृती समितीचे डॉ. शरद भंगाळे आणि श्री. प्रकाश कुलकर्णी उपस्थित होते.