श्रावण शुक्ल पक्ष चतुर्थी (१२.८.२०२१) या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करणारे श्री. महेंद्र सहस्रबुद्धे यांचा ४२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची पत्नी आणि लहान बहीण यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
श्री. महेंद्र सहस्रबुद्धे यांना ४२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
सौ. मानसी सहस्रबुद्धे (पत्नी), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
१. ‘श्री. महेंद्र स्वतः आनंदी रहातात आणि इतरांनाही आनंद देतात.
२. काटकसरी
ते नेहमीच धनाचा विनियोग काटकसरीने करतात. ते स्वतःसाठी अनावश्यक आणि महागड्या वस्तू कधीच विकत घेत नाहीत.
३. अभ्यासू वृत्ती
ते वैयक्तिक कामे आणि सेवा यांविषयीचा सूत्रांचा बारकाईने अभ्यास करतात, उदा. वस्तू खरेदी करतांना तिची गुणवत्ता, मूल्य, तिच्यातील घटक पदार्थ, तिचा टिकाऊपणा, वस्तूचे वजन, तिचे होणारे लाभ इत्यादी. त्यांच्यातील या अभ्यासू वृत्तीमुळेच आश्रमातील अनेक साधकांना स्वतःसाठी काही खरेदी करायचे असल्यास ते श्री. महेंद्र यांना विचारतात.
४. त्यांचा स्वभाव बोलका असल्याने त्यांची आश्रमातील सर्व वयोगटांतील साधकांशी चांगली जवळीक आहे.
५. प्रेमभाव
त्यांच्यातील प्रेमभावामुळे आश्रमातील बालसाधक त्यांच्याकडे आकर्षित होतात. एकदा त्यांनी आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. ऋग्वेदी गोडसे (वय ५ वर्षे) हिला पुठ्ठ्याचे घड्याळ बनवून दिले. ऋग्वेदी त्या घड्याळात पाहून ‘किती वाजले ?’, हे पहायला शिकली.
६. संगणकाविषयी पुष्कळ ज्ञान आत्मसात करणे आणि संगणकाविषयीच्या अडचणी सहजतेने सोडवू शकणे
संगणक हा त्यांचा साधनेतील पहिला सखा आहे. त्यांनी संगणकीय शिक्षण घेतले असल्याने पूर्णवेळ साधक झाल्यावर त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित संगणकीय सेवा मिळाली. त्यांनी संगणकाविषयी पुष्कळ ज्ञान आत्मसात केले आहे. ते संगणकाविषयीच्या अडचणी सहजतेने सोडवू शकतात.
७. इतरांना साहाय्य करणे
एकदा त्यांच्या एका मावशींना त्यांच्या वैयक्तिक कामांमध्ये साहाय्य हवे होते. तेव्हा त्यांनी मावशींना साधना म्हणून साहाय्य केले. मावशींचा मुलगा अंध असल्याने त्याच्या संदर्भातील सूत्रांविषयी ते वेळोवेळी साहाय्य करतात.
८. समष्टीचा विचार करणे
एकदा आम्ही ज्या बसमधून प्रवास करणार होतो, ती बस आगारातून नुकतीच धुऊन आणली होती. आम्ही बसमध्ये प्रवेश करताच ती पूर्णपणे ओली असल्याचे आमच्या लक्षात आले. बसमधील आसंद्याही ओल्या होत्या. तेव्हा महेंद्र लगेच बसमधून उतरून आगारातील चौकशी कक्षातील अधिकार्याकडे गेले आणि त्यांनी ‘प्रवाशांची कशी गैरसोय होते ? बस धुतांना काय काळजी घ्यायला हवी होती ?’, यांविषयीची सूत्रे त्या अधिकार्याला शांतपणे सांगितली. याचा परिणाम असा झाला की, बसच्या चालकाने बस पुसून घेतली. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘प्रत्येक प्रवाशाची वृत्ती अशी बनली, तर ‘ईश्वरी राज्य’ दूर नाही.’
९. जाणवलेले पालट
९ अ. पत्नीला घरकामात साहाय्य करणे : पूर्वी ते घरी गेल्यावर अधिक वेळ झोपत असत. आता ते मला ‘घरातील कामांत साहाय्य करणे, बाहेरून साहित्य आणणे, घरातील उपकरणांची दुरुस्ती करणे’, असे साहाय्य करतात.
९ आ. रागावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणे : पूर्वी कुटुंबियांशी मतभेद झाले की, ते पटकन प्रतिक्रियात्मक बोलत असत. त्यामुळे घरातील वातावरण बिघडत असे; मात्र ‘मागील काही मासांपासून ते रागावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत’, असे माझ्या लक्षात आले. कुटुंबियांमध्ये मतभेद झाल्यास ते शांतपणाने प्रसंग हाताळतात.
९ इ. व्यापकता निर्माण होणे : पूर्वी दैनिक ‘सनातन प्रभात’संबंधी सेवा करत असतांना त्यांच्यात संकुचितपणा होता. ‘ते आणि त्यांची सेवा’ एवढेच त्यांचे विश्व होते; मात्र मागील काही वर्षांपासून त्यांना सनातन संस्थेच्या विविध आश्रमांसाठी लागणार्या साहित्याची खरेदी करण्याची सेवा देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यात व्यापकता आली आहे.
९ ई. विविध सेवा शिकून त्यांत कौशल्य प्राप्त करणे : पूर्वी ते केवळ दैनिक ‘सनातन प्रभात’संबंधी संगणकीय सेवा करत असत. आता त्यांनी ‘संगणक दुरुस्ती, ध्वनीचित्रीकरण, छायाचित्रे काढणे, स्वयंपाकघरात यंत्रावर पोळ्या बनवणे’ इत्यादी सेवा शिकून घेतल्या आणि त्यांत कौशल्य प्राप्त केले आहे.
९ उ. मागील काही दिवसांपासून त्यांचे व्यष्टी साधनेचे गांभीर्यही वाढले आहे.
१०. प्रार्थना
‘हे श्रीकृष्णा, ‘श्री. महेंद्र यांच्याप्रमाणे माझ्यातही गुणांची वृद्धी होऊ दे. त्यांना निरोगी आयुष्य लाभू दे आणि त्यांची साधनेत प्रगती होऊ दे’, अशी प्रार्थना आहे.’ (३.४.२०२१)
कु. मेधा सहस्रबुद्धे (लहान बहीण), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
१. सहनशील
‘महेंद्रदादाला त्याच्या वयाच्या १२ व्या वर्षापासून अकस्मात् दम्याचा त्रास होऊ लागला. तेव्हा त्याला रात्रभर झोप लागत नसे. एवढा त्रास सहन करूनही तो आनंदी असायचा.
२. पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेणे
दादा साधनेत आल्यावर त्याचा दम्याचा त्रास उणावला. त्यामुळे त्याची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा वाढली आणि त्याने पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला.
३. शिकण्याची वृत्ती
दादा वर्ष १९९९ पासून पूर्णवेळ साधना करू लागला. तेव्हा तो मिरज आश्रमात दैनिक ‘सनातन प्रभात’मधील विज्ञापनांची संरचना करण्याची सेवा करत होता. पूर्वी त्याला याविषयी काही माहिती नव्हती. नंतर त्याने विज्ञापनांची संरचना शिकून घेतली आणि त्यात कौशल्य प्राप्त केले.
४. पुढाकार घेऊन सेवा करणे
तो प्रत्येक सेवा पुढाकार घेऊन करतो. त्याला स्वयंपाकघरात सेवेला बोलावल्यावर तो पुढाकार घेऊन ती सेवा परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करतो. देव त्याला त्या सेवेतही अनेक नवीन सूत्रे सुचवतो.
५. प्रार्थना आणि कृतज्ञता
‘गुरुमाऊलींच्याच कृपेने मला साधना करणारा भाऊ आणि साधना करणारे कुटुंब मिळाले’, यासाठी मी गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘दादामधील गुण मला स्वतःत आणता येऊ देत’, अशी गुरुमाऊलींच्या चरणी प्रार्थना आहे.’ (५.८.२०२१)