भाजपच्या ‘रस्ता बंद’ आंदोलनानंतर बांदा-दोडामार्ग रस्त्याच्या डागडुजीस प्रारंभ

बांदा-दोडामार्ग रस्त्याच्या डागडुजीस प्रारंभ (प्रातिनिधिक चित्र)

सावंतवाडी – बांदा-दोडामार्ग रस्त्यावरील खड्डे पावसाळ्यात वापरायच्या डांबराने बुजवावेत, या मागणीसाठी भाजपने ९ ऑगस्टला ‘रस्ता बंद’ आंदोलन केले होते. त्या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी ‘डिसेंबर मासात रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला प्रारंभ केला जाईल. तोपर्यंत पावसाळी डांबराने रस्त्यावरील खड्डे बुजवले जातील’, असे लेखी आश्वासन दिले. त्यानुसार १० ऑगस्टला सकाळपासून बांदा-दोडामार्ग रस्त्यावरील खड्डे पावसाळी डांबराने बुजवण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रारंभ केला. यामुळे वाहनचालक आणि प्रवासी यांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे. (रस्ता वाहतुकीस अयोग्य झाला आहे, हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांच्या लक्षात आले नव्हते का ? या रस्त्याच्या कामासाठी यापूर्वी जनतेने आंदोलने केली, निवेदनेही दिली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष का केले गेले ? आता भाजपने आंदोलन करून चेतावणी दिल्यानंतर कामाला प्रारंभ करणे म्हणजे ‘नाक दाबले की तोंड उघडते’ अशी प्रशासनाची कार्यपद्धत झाली आहे, असे समजायचे का ? – संपादक )