सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरणांसाठी ४८३ कोटी रुपये निधी संमत

धरणांसाठी जलसंपदा विभागाने ४८३ कोटी रुपयांचा निधी संमत केला आहे.

कणकवली – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लघुपाटबंधारे विभागाच्या प्रकल्पांसाठी (धरणांसाठी) जलसंपदा विभागाने ४८३ कोटी रुपयांचा निधी संमत केला आहे. जिल्ह्यातील अन्य प्रकल्पांसाठीही निधी संमत केला जाणार आहे. पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मोठ्या धरण प्रकल्पापेक्षा कणकवली मतदारसंघात लहान धरण प्रकल्प उभारावेत, यासाठी माझा प्रयत्न असणार आहे, असे मत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (जिल्हा बँकेचे) अध्यक्ष सतीश सावंत यांनी व्यक्त केले.

या वेळी सावंत पुढे म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरण प्रकल्पांसाठी निधी मिळावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जलसंपदा विभागाचे मंत्री जयंत पाटील यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली होती. यानुसार तिलारी, कोर्ले-सातंडी, देवघर, नरडवे, सरंबळ, अरुणा, विर्डी, तरंदळे, नाधवडे, कळसुली-देदोंवाडी, तळेरे, शिरशिंगे, निरूखे, या प्रकल्पांसाठी निधी मिळाला आहे. गावागावात जोपर्यंत शेती आणि बागायती यांना पाणी मिळत नाही, तोपर्यंत या भागाचा आर्थिक विकास होणार नाही.’’