शिरदोन-पाळे पंचायतीत पुन्हा नाट्यमय घडामोडी !
पणजी, ५ ऑगस्ट (वार्ता.) – शिरदोन-पाळे पंचायतीचे सरपंच जगदीश गावस यांच्या विरोधात नुकताच नाट्यमयरित्या ‘अविश्वास ठराव’ संमत झाला होता. पंचायतीचे पंचसदस्य कुश पालकर आणि पंचसदस्या नूतन शिरोडकर यांनी ‘अविश्वास ठरावा’ला पंचायत संचालनालयात आव्हान दिले होते. पंचायत संचालनालयाने यावर निवाडा देतांना ‘अविश्वास ठरावा’वर स्थगिती आणली आहे.
शिरदोन-पाळे पंचायतीचे सरपंच जगदीश गावस यांच्या विरोधात अविश्वास ठरावावर चर्चा होणार असल्याच्या दिवशी सकाळी पोलिसांनी पंचायत कार्यालयात चोरी झाल्याची सरपंच जगदीश गावस यांनी तक्रार केल्याचे कारण पुढे करून पंचायत कार्यालयाला टाळे ठोकले होते. पंचायत कार्यालयाला टाळे ठोकल्याने पंचायत मंडळाने कार्यालयाच्या बाहेर उघड्यावर बैठक घेऊन सरपंच जगदीश गावस यांच्या विरोधातील अविश्वास ठराव संमत केला होता. या कृतीला आव्हान दिल्यानंतर पंचायत संचालनालयाने ‘अविश्वास ठरावा’वर स्थगितीचा निवाडा दिला.
सामाजिक आणि ‘गोवा फॉरवर्ड’ यांचे कार्यकर्ते यांचा पंचायत संचालनालयातील अतिरिक्त संचालकांना घेराव
शिरदोन-पाळे पंचायतीचे सरपंच जगदीश गावस यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर स्थगिती आणल्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते आणि ‘गोवा फॉरवर्ड’ पक्षाचे कार्यकर्ते यांनी पंचायत खात्याच्या अतिरिक्त संचालकांना ५ ऑगस्ट या दिवशी घेराव घातला. कार्यकर्ते म्हणाले, ‘‘पंचायत संचालनालयाने आव्हान याचिकेवर परस्पर निर्णण देणे हा लोकशाहीचा खून आहे. पंचायत संचालनालयाच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे.’’