‘ईडी’च्या वतीने चौकशी करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
नागपूर – ‘येथील ‘मेट्रो’ प्रकल्पाचे ‘एम्.डी.’ (व्यवस्थापकीय संचालक) ब्रिजेश दीक्षित यांसह मेट्रो’च्या ९ संचालकांनी वैद्यकीय देयकांमध्ये घोटाळा केला आहे. त्यामुळे त्यांची अंमलबजावणी संचालनालयाच्या (‘ईडी’च्या) वतीने चौकशी करण्यात यावी’, अशी मागणी ‘जय जवान जय किसान संघटने’चे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार यांनी ४ ऑगस्ट या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. या वेळी याविषयीची कागदपत्रेही त्यांनी पत्रकारांना दिली.
पवार पुढे म्हणाले, ‘‘मेट्रो प्रकल्पा’च्या ‘एम्.डी.’सह इतर संचालकांनी ३ वर्षांत कोट्यवधी रुपयांच्या वैद्यकीय देयकांचे पैसे घेतले आहेत. हे देयक घेणार्या संचालकांना नेमका कुठला आजार झाला आहे ? त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून ‘मेट्रो’च्या रोगी संचालकांना घरचा रस्ता दाखवण्यात यावा.’’ ‘मेट्रो’चे जनसंपर्क अधिकारी अखिलेश हळवे यांनी प्रशांत पवार यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले की, वैद्यकीय देयकांमध्ये विविध ‘हेड्स’ असल्याने देयकांचा आकडा अधिक दिसतो.
‘मेट्रो प्रकल्पा’च्या संचालकांनी ३ वर्षांत किती रुपये वैद्यकीय देयक घेतले ?१. ब्रिजेश दीक्षित, ‘एम्.डी.’- १ कोटी १५ लाख रुपये २. महेश कुमार, ‘डब्ल्यू.टी.डी.’ – २१ लाख ८० सहस्र रुपये ३. सुनील माथुर, ‘डब्ल्यू.आय.टी.डी.’ – ४३ लाख रुपये ४. एस्. शिवानाथन्, ‘सी.एफ्.ओ.’ – २१ लाख रुपये ५. रामनाथ सुब्रमानियम, ‘डब्ल्यू.टी.आय.’ – २ कोटी रुपये |